गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ढोंगी बुवांना शरण जाण्याची गुलाम प्रवृत्ती वाढतेय?


गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ढोंगी बुवांना शरण जाण्याची गुलाम प्रवृत्ती वाढतेय?

=================

गंभीर गुन्ह्यात आरोप, अटक झाल्यानंतरही त्या बाबाच्या, बुवाच्या अथवा स्वामीच्या भक्तांमध्ये वाढ होताना दिसून येते, असे अलिकडे वारंवार घडताना दिसू लागले आहे. विचार करण्याची थोडीही क्षमता शिल्लक असलेल्या कोणत्याही व्यक्तीची मती गुंग व्हावी असे हे समाज वास्तव आहे.

~हमीद दाभोलकर

स्वामी नित्यानंद ह्या स्वयंघोषित बाबांच्यावर लहान मुलींना पळवून नेण्याचा आणि डांबून ठेवण्याचा आरोप झाला व त्या नंतर ते फरार झाले, ह्या गोष्टीला आता तीन आठवडे झाले आहेत. लक्षावधी लोक ज्यांना ‘दैवी अवतार’ मानतात अशा बाबाबुवांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप होणे आणि त्यामध्ये त्यांना अटक होणे ह्याचे आता आपल्या देशात फारसे नवल राहिलेले नाही! आधी आसाराम मग रामपाल त्या नंतर रामरहीम , विरेंद्रदेव दीक्षित स्वामी अश्या अनेक घटना गेल्या तीन चार वर्षांच्या मध्ये आपल्या समोर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर नित्यानंद ह्यांच्यावरचे आरोप आणि त्यांचे फरार होणे ह्याचे लोकांना फारसे नवल वाटले नाही.

तेव्हड्यात आणखी एक बातमी आली की ह्या नित्यानाद स्वामी यांनी वेस्ट इंडीज मधील त्रीनिनाद देशाच्या शेजारी एक बेट खरेदी केले आहे आणि त्या देशाचे एक ‘कैलास’ नावाचे राष्ट्र देखील घोषित केले आहे ! ह्या कैलास देशाचा वेगळा पासपोर्ट आहे, असा देखील दावा त्यांच्या वेबसाईटवर करण्यात आलेला आहे. ह्या अनुषंगाने ह्या नित्यानंद स्वामींचे प्रताप समजून घेणे आणि त्यांच्या सारख्या भोंदू लोकांच्या पासून स्वत:ला वाचवण्यासाठी काय करणे आवश्यक आहे हे आपण समजून घेतले पाहिजे.

नित्यानंद बाबांचे सर्वच अजब म्हणावे असे आहे. एका व्हिडिओत ते भक्तांना सांगतात की, ‘आज आपल्या पृथ्वीवर सूर्य अर्धा तास उशीरा उगवला, तो केवळ माझ्या सांगण्याने.!’ मला जरा उशीर झाल्याने मीच सूर्याला सांगितले की, ”बा सूर्या तू जरा अर्धा तास उशीरा उगव आणि सूर्याने माझे ऐकले.’ आपल्याला वाटेल, की हे विधान स्वामीजी विनोदाने करीत आहेत. प्रत्यक्षात तसे अजिबात नाही. ते हे विधान हसत हसत करतात पण विधानातील आशयाविषयी ते अत्यंत गंभीर असतात. केवळ तेच नाही तर त्यांचे प्रवचन ऐकायला समोर जमलेले हजारो भक्त देखील अत्यंत गांभीर्याने ह्या विधानावर बाबांचा जयजयकार करतात! ह्या पुढचे आश्चर्य म्हणजे, हे भक्त हे कोणी ‘गरीब बिचारी कुणीही हाका’ अशी ग्रामीण अशिक्षित जनता नसते तर उत्तम इंग्लीश बोलणारे, उच्चशिक्षित आणि खात्यापित्या घरातील लोक असतात!

काही वेळा हे स्वामी भक्तांना सांगतात की पूर्वी एकशे सत्तावीस वर्षे जगायचे ठरवले होते पण आता मी दोनशे वर्षे जगायचे ठरवेले आहे. तर आणखी काही वेळा म्हणतात की, माझे शिष्य हे मानव कुळातील नाहीतच मुळी, मानवाच्या पुढची एक प्रजाती मी जगात निर्माण केली आहे आणि माझे सर्व अनुयायी मी हळू हळू त्या प्रजाती मध्ये घेवून जाणार आहे. ही सर्व प्रवचने व्हिडिओ स्वरुपात उपलब्ध असून, ‘मी असे म्हटलेच नव्हते’! असा दावा नित्यानंद स्वामी करत नाहीत. उलट पोलिसी ससेमिरा मागे लागल्यावर देखील आपल्या संदेशात ते आपल्या क्षमतांचा पुनर्रुचार करतात! एखाद्या विनोदी नाटक अथवा चित्रपटाला शोभावे असे हे कथानक नसून हे सर्व आपल्या आजूबाजूला घडणारे वास्तव आहे हे स्वीकारणे कितीही अवघड वाटत असले तरी सत्य आहे. नित्यानंद स्वामींची दुसरी बाजू देखील थोडी समजून घेवू या. गेल्या दहा वर्षांत नित्यानंद स्वामीवर अनेक पोलीस केस दाखल आहेत.

तामिळनाडूमधील एका प्रसिद्ध मंदिरातील प्रसादात गुंगीची औषधे घालत असल्याच्या संशयावरून त्या मंदिराच्या विश्वस्तांनी त्यांना निलंबित केले होते, बंगलोरमधील आश्रमात स्रीयांचे शोषण केल्याची केस देखील त्याच्यावर आहे, गुजरात मधील त्याच्या आश्रमाची जागा शासनाने त्याला दिली आहे. त्या विषयी कोर्टात सुनावणी चालू आहे. त्याच्यावरील अनेक गुन्ह्यांचा पोलीस तपास चालू आहे आणि टोकाचा विरोधाभास असा की दुसऱ्या बाजूला नित्यानंद स्वामींचे शिष्यमंडळ वाढतच आहेत. हे केवळ नित्यानंद स्वामींच्या बाबतीत घडत नसून आज तुरुंगात असलेल्या आसाराम ,रामपाल, रामरहीम ह्या लोकांच्या बाबतीत देखील घडताना दिसून येते. विचार करण्याची थोडीही क्षमता शिल्लक असलेल्या कोणत्याही व्यक्तीची मती गुंग व्हावी असे हे समाज वास्तव आहे. आपल्या देशाच्या समाजमनाला काही तरी भयंकर अतर्गत विसंगतीने ग्रासले असल्याचे हे लक्षण आहे.

डॉ नरेंद्र दाभोलकर म्हणत असत त्या प्रमाणे, ‘ह्या देशाने विज्ञानाची सृष्टी घेतली पण दृष्टी घेतलेली नाही.’ विज्ञानाचे फायदे म्हणून येणाऱ्या टीव्ही , मोबाईल, गाड्या इंटरनेट, सोशल मिडिया अशा सर्व गोष्टी आपण समाज म्हणून मोठ्या प्रमाणात आपल्याशा केल्या. परंतु ‘विज्ञानाची दृष्टी’ म्हणजे चिकित्सक मनोवृत्ती मात्र घ्यायला आपण विसरलो. आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचे निरीक्षण करून त्या मधून शोधक विचाराच्या माध्यमातून निष्कर्ष काढणे हे मानवजातीला इतर प्राणी मात्रांच्या पेक्षा वेगळे काढणारे लक्षण आपण विसरून गेलो की काय? असा प्रश्न ह्या मुळे मनात निर्माण होतो.

ह्या प्रश्नाचे आणखी एक अंग आपण सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे ते आहे मानवी जीवनातील वाढत्या ताण तणावांचे. एकुणात आपल्या दैनंदिन जीवनात जरी सुबत्ता वाढली असली तणाव देखील खूप मोठ्या स्वरुपात वाढलेले आहेत. मानवाचे मन जेव्हा अस्वस्थ असते तेव्हा ते बुवा-बाबांच्या भूल थापांना बळी पडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणत वाढते, हे आपण सर्वजण आजूबाजूला अनुभवत असतो. वाढलेल्या टेन्शनच्या प्रभावाखाली विचार करणाऱ्या मेंदूवर जणू भावना शरणतेचे काळे ढग पडदा टाकतात आणि केवळ भावनांचा मेंदूच काम करीत राहतो. यामधून चिकित्सक बुद्धी वापरणे टाळले जाते.

आपल्या देशातील शिक्षण व्यवस्था देखील मुलांच्या मनातील चिकित्सक भावनेला पाठबळ देण्या पेक्षा, ‘बाबा वाक्यं प्रमाणाम’ शिकवण्यातच धन्यता मानतात. स्वाभाविकच आहे की ह्या व्यवस्थे मधून शिकून बाहेर पडणारे तथाकथित उच्चशिक्षित देखील भूल थापांना सहज बळी पडतात. ह्या पलीकडे देखील एक गंभीर गोष्ट म्हणजे पोलीस यंत्रणा, न्यायालय आणि समाजमन ह्यांच्याकडून ह्या भोंदू बाबा बुवांना मिळणारी छुपी मान्यता.

नित्यानाद स्वामींचे उदाहरण ह्या बाबतीत बोलके आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये ह्या बाबाने आपल्या भोंदूपणाचे अनेक पुरावे पोलीस, न्यायालय आणि समाज व्यवस्थेला दिले होते. त्या पैकी कोणत्याही गोष्टीवर ह्या यंत्रणांनी कठोर पावले उचलली नाहीत. जागे होण्यासाठी जणू काही अधिक गंभीर होण्याची वाट बघत आपण सुस्त पडून होतो. धर्माच्या नावावर चाललेला हा काळाबाजार आपण का खपवून घेतो?

अंनिसच्या प्रयत्नाने महाराष्ट्रात पारित झालेला जादूटोणा विरोधी कायदा देश पातळीवर लागू होण्यासाठी प्रयत्न करणे हे देखील एक महत्वाचे पाउल ठरू शकते. गेल्या पाच वर्षात ह्या कायद्याअंतर्गत महाराष्ट्रात पाचशेहून अधिक छोट्या मोठ्या भोंदू बाबा बुवांना तुरुंगाची हवा चाखावी लागलेली आहे. भारतीय राज्यघटनेनुसार चालणाऱ्या देशात राहायचे, की नित्यानंद स्वामींच्या तथाकातीत ‘कैलास राष्ट्रात’? या प्रश्नांचे उत्तर आपल्या सर्वांना स्वत:च मनाशी प्रामाणिकपणे देणे आवश्यक आहे. अन्यथा एक उन्नत मानवी प्रजाती निर्माण करण्याचा दावा करणारे हे बाबा-बुवा आपले माणूसपण आपल्याला कधी विसरायला लावतील ते आपल्याच कळून येणार नाही.

आदिनामा या फेसबुक page वरून सभार .

Next Post

शेखर गुप्ता, त्यांचीही जातकुळी जाहीर करा!

शनी डिसेंबर 28 , 2019
शेखर गुप्ता, त्यांचीही जातकुळी जाहीर करा! *********************** ■ दिवाकर शेजवळ ■ दलित मागास नेते सर्वाधिक भ्रष्ट असतात आणि मुसलमानांमध्ये गुन्हेगार अधिक असतात, असा दावा ‘प्रिंट’ चे संपादक शेखर गुप्ता यांनी केला आहे। त्यांची ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी घेतलेली उलटतपासणी। divakarshejwal1@gmail.com […]

YOU MAY LIKE ..