आठवणीतले प्रा अरुण कांबळे


आठवणीतले प्रा अरुण कांबळे
*********************
■ दिवाकर शेजवळ ■
divakarshejwal1@gmail.com

प्रा अरुण कांबळे।
भारतीय दलित पँथरचे पहिले अध्यक्ष ते माजी पंतप्रधान व्ही पी सिंग यांच्या बोफोर्सविरोधी उठावातून जन्मलेल्या जनता दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस। जनता दलाच्याही रिपब्लिकन गटांप्रमाणेच चिरफळ्या उडाल्यानंतर कांबळे सरांच्या पदरी भ्रमनिरास, अपेक्षाभंग आणि निराशाच पडली होती। पण वैचारिक विश्वात आणि साहित्य क्षेत्रात मात्र त्यांचा बौद्धिक दरारा कायम होता। परिषदा, संमेलने, व्याख्यानमाला, चर्चासत्रे अशा कार्यक्रमातून त्यांचा परिवर्तनाचा जागर सुरूच होता।

हैद्राबाद येथे झालेल्या अपघातात सरांचे अकाली निधन होऊन दशक उलटले हे आजही खरे वाटत नाही। कारण त्यांच्या चळवळीतील आठवणी हजारो पँथर्स आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या मनात ताज्या आणि तितक्याच टवटवीत आहेत। 1980 च्या दशकात ते घाटकोपरला त्रिलोक इमारतीत राहायला असताना आमचे शेजारीच म्हणायचे! कारण त्यावेळी रमाबाई कॉलनीत असताना नामांतर लढ्याच्या काळात आमच्या भेटी व्हायच्या। सर कधी कॉलेजला निघालेले असताना वडाळ्याला जाणाऱ्या त्यांच्या इमारती समोरच्या बस क्रमांक 353 च्या स्टोपवर भेटायचे, तर कधी सिद्धार्थ विहार हॉस्टेल वा डॉ आंबेडकर कोलेजवर भेटायचे।

रिडल्सच्या लढ्यात हिंदुत्ववादी विचारवन्त मंडळींचा समर्थपणे मुकाबला राजाभाऊ ढाले आणि प्रा अरुण कांबळे सर यांनीच केला होता। त्या आंदोलनावेळी ढाले यांचा ‘धम्मलिपी’ , कांबळे सरांचा ‘आंबेडकर भारत’ आणि माझा ‘जाणीव’ चा अंक प्रकाशित व्हायचा।

प्रा अरुण कांबळे यांचे शब्दोच्चार स्पष्ट, खणखणीत, भाषा धारदार आणि विचार मांडण्याची शैली प्रभावी होती। भाषणावेळी राज्यकर्त्यांना वा जातीयवाद्यांना टाचा उंचावून इशारा देण्याची सरांची स्टाईल आजही मनचक्षुसमोरून हटत नाही।
पँथर कांबळे सरांना विनम्र अभिवादन।

Next Post

अंधश्रद्धेवर किर्तनाच्या माध्यमातुन आसुड ओढणारे संत गाडगेबाबा यांना स्रुतीदिनानिमित्त कोटी कोटी अभिवादन!

शनी डिसेंबर 21 , 2019
अंधश्रद्धेवर किर्तनाच्या माध्यमातुन आसुड ओढणारे संत गाडगेबाबा यांना स्रुतीदिनानिमित्त कोटी कोटी अभिवादन! संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव – झिंगराजी राणोजी जाणोरकर तर आईचे नाव – सखुबाई झिंगराजी जणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक […]

YOU MAY LIKE ..