इंदिराजी गांधी आणि दलितांची आंदोलने..!.

इंदिराजी गांधी आणि दलितांची आंदोलने…!

इंदिराजी गांधी।भारताला लाभलेल्या ‘सबला’ पंतप्रधान।

आज देशात घुसून आपल्या लष्करी तळांवर हल्ले चढवणाऱ्या पाकिस्तानचे त्यांनीच तुकडे पाडले। त्यातून स्वतंत्र बांगला देशाची निर्मिती झाल्यानंतर इंदिराजी यांना ‘दुर्गा’अशी उपमा देत भाजप नेते,माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी संसदेत गौरवले होते। आपल्या कणखर नेतृत्वाद्वारे इंदिराजींनी जगात भारताचा दरारा निर्माण केला होता।

त्यांनी बँकांच्या केलेल्या राष्ट्रीयिकरणामुळे संविधानाने आरक्षणाचा अधिकार दिलेल्या अनुसूचित जाती- जमातींना सरकारी नोकऱयांचे नवे दालन खुले झाले होते। ‘गरिबी हटाव’ चा नारा दिल्यामुळे उपेक्षित, शोषित, श्रमिक, दलित असे सारेच घटक एका आशेपोटी इंदिराजी यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित झाले होते।

(छायाचित्र: पँथर नेते प्रा अरुण कांबळे हे दलितांवरील अत्त्याचारांची कैफियत इंदिराजी गांधी यांच्यापुढे मांडताना)

मात्र 1970 च्या दशकात त्यांच्याच राजवटीत दलितांवर देशभरात अन्याय आणि हिंसक अत्त्याचार वाढीस लागले होते। 1972 सालात महाराष्ट्रात त्याविरोधात संतप्त दलित तरुणांच्या उद्रेकातून ‘दलित पँथर’ चा जन्म झाला होता। ‘बेलची- आग्रा- मराठवाडा, जातीयतेला गाडा गाडा’ ही पँथरच्या त्यावेळच्या आंदोलनातील एक घोषणा होती। त्यातून अत्त्याचारांचो व्याप्ती स्पष्ट होत होती। महाराष्ट्रात इंदापूर बावडा येथे दलितांवर बहिष्कार टाकला गेला होता। तर, गवई बंधूंचे डोळे काढल्याचे प्रकरण म्हणजे जातीयवादाचा क्रूर चेहराच होता। त्या प्रश्नांवर पँथर नेत्यांनी इंदिराजी गांधी यांच्या भेटी घेऊन दाद मागितली होती।

इंदिराजींकडे आपल्या विरोधात तक्रार पोहोचली तर आपली धड गत नाही, या भीतीने त्या काळातील काँग्रेसचे मुख्यमंत्री/ मंत्री यांची पाचावर धारण बसायची। 1972 -78 दरम्यानच्या काळात कधी गृह राज्यमंत्री तर कधी मुखमंत्री असताना शरद पवार यांच्या विरोधात पँथरच्या संस्थापक नेत्यांनी इंदिराजी गांधींकडे धाव घेत दाद मागितली होती। राजा ढाले, नामदेव ढसाळ, ज वि पवार यांच्यासारख्या पँथर नेत्यांचे पुढील काळात कधीही शरद पवार यांच्याशी सूत न जुळण्याचे तेच कारण ठरले।

दलित मुक्ती सेनेची युरी आंड्रोपोव्हकडे धाव

इंदिराजी गांधी यांनी सत्तेवर असतांना त्यांच्या विरोधातील डाव्या पक्षांविरोधात एकदा भारताचा मित्र असलेल्या कम्युनिस्ट रशियाच्या राज्यकर्त्यांकडे सहकार्य मागितले होते। राजकीय नैतिकतेत ते बसणारे नव्हतेच। त्या पार्श्वभूमीवर, दलितांवरील वाढत्या अत्त्याचाराबद्दल रशियाने भारत या मित्र देशातील इंदिरा सरकारला समज द्यावी, अशी खळबळजनक, पण रास्त मागणी त्यावेळी दलित मुक्ती सेनेने केली होती। त्यावेळी युरी आंड्रोपोव्ह हे रशियाचे राष्ट्र प्रमुख होते।

दलित मुक्ती सेना केवळ मागणी करूनच थांबली नव्हती। तर, आपल्या मागणीसाठी मुंबईतील नेपियनसी रोडवरील रशियन वकालतीवर प्रचंड मोठा धडक मोर्चाही काढला होता। त्या काळात सर्व मोर्चे हे आझाद मैदानातून बाहेर पडून हुतात्मा चौक येथे जायचे। पण दलित मुक्ती सेनेचा प्रा जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील तो मोर्चा आझाद मैदानातून गिरगाव मार्गे रशियन वकालतीवर धडकलेला पहिला मोर्चा ठरला होता। तेव्हा मी दलित मुक्ती सेनेचा मुंबई प्रदेशचा सरचिटणीस होतो।
त्या मोर्चाचा मार्ग आणि मागणीच वेगळी होती असे नव्हे , तर मोर्चातील भीमसैनिकांचा जोश, आवेशही भन्नाट होता। जणू रशियावर चढाई करायलाच आपण निघालोय, असाच भाव भीमसैनिकांच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता।

कारण- ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांनी दोन दिवस आधी महाराष्ट्र टाईम्स मध्ये दिलेली त्या मोर्चाची बातमी होती:

“दलित मुक्ती सेनेची युरी आंड्रोपोव्हकडे धाव!”

पण नंतरच्या काळात इंदिराजींच्या पश्चात परिस्थिती आणि वातावरण बदलत गेले। काँग्रेसच्या हायकमांडचा धाक फक्त पक्षांतर्गत राजकारणापूरता उरला। राज्य कारभाराबाबत दाद मागण्याच्या दृष्टीने हायकमांडची आश्वासकता लोप पावली।

लेखक-दिवाकर शेजवळ
divakarshejwal1@gmail.com

Next Post

चळवळीतून नाटक आणि नाटकातून चळवळ व त्यातून "स्टडी सेंटर "

शनी नोव्हेंबर 2 , 2019
चळवळीतून नाटक आणि नाटकातून चळवळ व त्यातून “स्टडी सेंटर ” उभे करण्याकरिता चळवळीतील अनोखा उपक्रम…..राबवत आहेत “भारतीय लोकसत्ताक संघटना अन लोक हितकरणी संस्था” भारतीय लोकशाही.. या लोकशाहीला बळकट करणारे चार स्तंभ.पण या स्तंभांच्या मजबुतीचं काय? हाच विचार डोळ्यासमोर ठेऊन “भारतीय लोकसत्ताक […]

YOU MAY LIKE ..