किल्लारी भूकंपाच्या-आठवणी मनात दाटतात तेव्हा….
■ दिवाकर शेजवळ ■
divakarshejwal1@gmail.com
मराठवाड्यातील किल्लारी येथे झालेल्या भयंकर भूकंपाला आज 26 वर्षे झाली। निवडणुकीच्या मोसमात त्याचे सगळ्यांना विसमरण झाले, अशी खंत नामवंत पत्रकार Praveen Bardapurkar यांनी पोस्ट टाकून व्यक्त केली आहे। त्या निमित्ताने माझ्याही मनात किल्लारीच्या आठवणी जागल्या आहेत।
किल्लारीचा भूकंप झाला,तेव्हा मी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या ‘महानगर’ या सांज दैनिकात उपसंपादक होतो। त्या भूकंपाचे वार्तांकन करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार निळू दामलेसाहेब थेट किल्लारीला धडकले होते। ते रोज महानगर साठी वृत्तमालिका लिहित होते। रात्रपाळीचा उपसंपादक मी असायचो। त्यावेळी किल्लारीच्या बातम्यांना मी दिलेल्या मथळ्यांना दाद देत दामले साहेब यांनी कौतुक केले होते।
उदा: मंत्र आणि हुंदक्यांशिवाय त्यांच्या चिता पेटल्या!
त्यावेळी जोगेश्वरी येथील एसआरपीचे जवान बचाव आणि मदत कायाॅसाठी गेले होते. तेथील तळणी हे गाव पूणॅपणे स्मशान झालेले. तिथे घड़लेला आणि पाहिलेला एक प्रसंग नाईक नावाच्या एसआरपी जवानाच्याच शब्दात…..
तळणी गावात कोणीच वाचलेले नव्हते. पण भूकंपाच्या दुसर्या दिवशी एक जण बाहेरून तिथे आलेला.पवार नावाचा तो इसम त्या गावाचा जावई होता. दूरच्या ठिकाणी कामाला असल्याने बचावला होता. एका घराच्या ढिगार्यावर तो रड़त बसायचा.मृतदेह बाहेर काढण्यात अड़सर नको म्हणून त्याला आम्ही हाकलत होतो. पण तो हटतच नव्हता.
अखेर तीन दिवसांनी त्याच्या जागेवरील ढिगारा उपसताना ड़ाॅ.बाबासाहेब आंबेड़कर यांचा फोटो त्यातून बाहेर आला. नंतर तो पवार क्षणभरही तिथे थांबला नाही. त्या फोटोला कवटाळत तो निघून गेला!
एसआरपीच्या नाईक यांनी हा प्रसंग मुंबईत येताच आंबेडकरी समाजातील प्रख्यात कवी- गायक नवनीत खरे यांना ऐकवला.त्यानंतर खरे यांचे शब्द होते…….
ते गढू जाऊ द्या वा फूटू जाऊ द्या
मला बस्स भीमाचे माझ्या फोटू घेऊ द्या
माय बाप पत्नी बंधू बहिण लेकरे ती
या धरणीने गिळली मुकी पाखरे ती
ती जळू जाऊ द्या वा मिटू जाऊ द्या
मला बस्स भीमाचे माझ्या फोटू घेऊ द्या
गेल्याच पगाराला मढून चांगले मी
श्रध्दा म्हणून भिंतीवरी टांगले मी
बाकीचे धन ते लुटू जाऊ द्या
मला बस्स भीमाचे माझ्या फोटू घेऊ द्या
झरा आता मदतीचा चहुकड़ून वाही
कोण कोठ पावे तो पोहोचून राही
तो झरा मदतीचा भले आटू जाऊ द्या
मला बस्स भीभाचे माझ्या फोटू घेऊ द्या
नको मला घर बंगला महाल अथवा माडी
राहील कशी आता त्या संसारात गोडी
जनसेवे नवनीत आता झटू जाऊ द्या
मला बस्स भीमाचे माझ्या फोटू घेऊ द्या.