बगलबच्चे कोण?
दुसऱ्या अधिवेशनामध्ये #गांधीजींनी इतर प्रतिनिधींना अत्यंत अनुदारपणे वागविले यात शंका नाही. इतर सर्व समाजाचे पुढारी ब्रिटिशांचे बगलबच्चे होते, हे म्हणणे गांधीजींना शोभण्यासारखे नव्हते. त्याचप्रमाणे अल्पसंख्याकांच्या प्रश्नांचे स्वरूप व महत्व काय आहे याचीही त्यांना नीटशी कल्पना नव्हती. म्हणून ते घटकेत म्हणत की हिंदू-मुसलमानांचे ऐक्य केल्याशिवाय व अस्पृश्यता नष्ट केल्याशिवाय भारताला स्वातंत्र्य नको, तर घटकेत म्हणावयाचे की अल्पसंख्यांकांचा प्रश्न महत्वाचा नाही आणि भारताची सर्व घटना अाधी लिहून काढून अल्पसंख्यांकांच्या प्रश्नांसाठी एक परिच्छेद कोरा ठेवून त्यात न्यायालयीन लवादाची तरतूद करावी.
एकट्या बाबासाहेबांविरुध्द का?
राऊंड टेबल काॅन्फरन्सच्या पहिल्या अधिवेशनावर बहिष्कार टाकणारे गांधीजी, हे दुसऱ्या अधिवेशनास हजर राहण्याचे निमंत्रण मिळावे म्हणून, केवढ्यातरी अपमानास्पद नाकधुऱ्या काढीत, त्यावेळच्या व्हाईसरॉयबरोबर वाटाघाटी करीत होते. मात्र दुसऱ्या अधिवेशनास हजर राहण्यापूर्वी ज्या गांधीजींनी स्वातंत्र्यासाठी अंतिम लढा दांडीयात्रेच्या रूपाने चालविला होता तेच गांधीजी दुसऱ्या अधिवेशनात ब्रिटिश सरकारविरुध्द का लढले नाहीत? स्वातंत्र्यासाठीसुध्दा का लढले नाहीत? गांधीजी जसे ब्रिटिश सरकारविरुध्द लढले नाहीत त्याचप्रमाणे ते मुसलमान, शीख आदींच्या पुढाऱ्यांबरोबरही का लढले नाहीत? मग एकट्या बाबासाहेब आंबेडकरांच्याविरुध्द तेवढे ते का लढले? मुसलमान, शीख, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, युरोपियन, व्यापारी इत्यादींचे हक्क मान्य करुन, त्यांना स्वतंत्र मतदार संघ घ्यावयास असणारे गांधीजी फक्त अस्पृश्य समाजास हक्क देण्याविरुध्द का लढले?
‘भारत स्वराज्यास कसा पात्र आहे हे प्रथम सिध्द करावे व मग स्वातंत्र्य घ्यावे’ असे जे आव्हान ब्रिटिशांनी दिले होते ते गांधीजींनी अगर इतर पुढाऱ्यांनी का स्वीकारले नाही?
राऊंड टेबल काॅन्फरन्स जितकी ऐतिहासिक व #महत्वाची तितकीच ती अप्रकाशित व दुर्लक्षिलेली ठेवली गेली आहे. का कोणास ठाऊक? ही मोठी खेदजनक गोष्ट आहे. राऊंड टेबल काॅन्फरन्समध्ये दृष्टोत्पत्तीस आलेल्या खाचखळग्यांचा बारकाईने अभ्यास करुन, त्यापासून योग्य तो बोध घेतल्याशिवाय कोणतेही घटनात्मक प्रश्न सुटणे अशक्य आहे.
राऊंड टेबल काॅन्फरन्स बाबत फारच त्रोटक माहिती, त्याकाळी (१९३०-३३) भारतीय जनतेस उपलब्ध करुन देण्यात आली तेवढीच. तीही माहिती गैर, चुकीची व खोटी आहे. ‘डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींना विरोध केला; ते ब्रिटिशांचे हस्तक होते; अस्पृश्यांकरिता स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करून सवतासुभा निर्माण केला व स्वातंत्र्याला खीळ घातली व शेवटी राऊंड टेबल काॅन्फरन्स मोडली ‘ असा तो प्रचार होय. यामधील सत्य काय आहे? ते जर याउलट असेल तर हा खोटा प्रचार पुसून काढलाच पाहिजे. एवढेच नव्हे तर सत्य काय हेही जगापुढे आले पाहिजे.
– इंजि सुरज तळवटकर