सरकार मागासवर्गीयांचे किती मुडदे पाडणार आहे?
” उपरा “कार लष्मण माने कोणत्या मस्तीत वावरत आहेत?
अहमदनगर जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मागील दोन दशकांत मागासवर्गीयांच्यावर विविध कारणास्तव हल्ले झाले. बलात्कार, विनयभंग, विटंबनेच्या घटना याचा विचार करता हा जिल्हा नेहमीच आघाडीवर राहिला असून, जातीयवादी मानसिकतेचा कळस गाठणारा जिल्हा अशी ओळख असल्याचा ठपका एका अहवालानुसार ठेवण्यात आला. दोन वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या या अहवालानंतरही जातीयवादी भूमिकेतून बाहेर पडण्यास येथील धर्मांध शक्ती तयार नाही. त्यांच्यावर आजही पुष्यमित्र शुंगाने सुमती भार्गव या सामवेदी ब्राम्हणाला हाताशी धरुन जाचक नियमावली तयार केलेल्या ‘मनुस्मृती ‘चा प्रभाव असून, मनुने उर्फ पुष्यमित्र शुंगाने तयार केलेल्या जाचक अटींचा आजही येथील मानसिकतेचा प्रभाव आहे. वैदिक काळात वर्णाश्रम व्यवस्थेने पाया घातला गेला, परंतु त्याहीपेक्षा भयानक षड्यंत्र शुंगाने घराण्यातील राजवटीत रचले गेले. चक्रवर्ती सम्राट राजा अशोक यांनी भिक्खू संघातील ऐतखाऊ ब्राम्हण भिक्खूंची हकालपट्टी केल्याचा राग शुंगाने राजा ब्रुहदत्त ( इ. स. पण. १८५ ) याचा कपटाने खून करुन बदला घेतला हा इतिहास आहे. पण आपण वास्तवाच्या मुळापर्यंत जाऊनही वास्तवाला स्पर्श करण्यास कमी पडलो. वस्तुस्थिती आणि वास्तव याचा संबंध जोडताना एका विशिष्ट गर्तेत गिरक्या घेत राहिल्याचा हा परिणाम आहे हे आता तरी मान्य करतील अशी आशा करायला हरकत नाही. मनुने अर्थात शुंगाने वैदिक विचारधारेचा प्रचार केला. तर हाच विचार आद्य शंकराचार्यांने ६ व्या शतकात हिंदू नामक पंथाची स्थापना करून त्याला अधिकच बळकटकरण्याचा प्रयत्न केला. शंकराचार्यांने शुंगनिर्मित माणसा माणसात भेदभाव करणारे तत्वज्ञान स्विकारले. अशाप्रकारे जातीवादाला खतपाणी घालण्यास एकप्रकारे पुरस्कार केल्याचा जो ठपका बसला त्यामागील हे प्रमुख कारण सांगता येईल. शंकराचार्य जातीयवादी आहेत असा नेहमीच आक्षेप घेतला जातो, त्यामागील कारणांचा किती जणांनी शोध घेतला?
सुधारणापर्वात सुधारकांनी धर्मांधतेवर आघात करेपर्यंत धर्मप्रामाण्य इतके चिवट झाले होते की, या प्रवाहात उतरल्यावर तळाशी तयार झालेल्या शेवाळामुळे पाय घसरण्याचीच अधिक शक्यता होती. त्याचा जिवंत अनुभव महामानवांना आला. त्यामुळे सुधारणा पर्वात अमानवी मूल्यांविरोधात चळवळ उभारल्यानंतरही समाज आधुनिकतेच्या विचारप्रणालीचा स्वीकार करण्याऐवजी जीर्णमतवादाचा पुरस्कार करण्यात धन्यता मानू लागला. धर्मांधतेचे हे विष अंगी इतके भिनले आहे की, मागासवर्गीयांना दुय्यम स्थान तर दिलेच त्याशिवाय त्यांचे देवही अस्पृश्य ठरविले! इ. स. पूर्व १८५ ते १८८ या कालावधीत तयार करण्यात आलेल्या मनुस्मृती शुंगाने आर्यकौटिल्य उर्फ चाणक्याच्या नीतीचा पुरेपूर फायदा समाजात जातीय उतरंड निर्माण केली. चंद्रगुप्त मौर्य कधीही चाणक्याच्या तालावर नाचला नाही हा राग ब्राम्हणांच्या डोक्यात होताच, तो राग राजा अशोकाच्या निर्वाणानंतर बाहेर काढला हे वास्तव सांगता येईल. थोडक्यात मौर्य घराण्याचा एक वारस राजा अशोकाच्या हातात तलवार होती तोपर्यंत मांजर दिसताच उंदीर बिळात लढतात तसे हे धर्मांध शेपूट घालून बसले होते हे दुसरे वास्तव सांगता येईल.
(क्रमशः)
गुणाजी काजिर्डेकर, चेंबूर