राज ठाकरे यांच्या दिल्ली भेटीच्या निमित्ताने….. ईव्ही

ईव्ही एम मारी, त्याला कोण तारी ?
-दिवाकर शेजवळ

मनसे प्रमुख राज ठाकरे यांची दिल्लीची ताजी भेट गाजते आहे। ते ईव्हीएमविरोधात निवडणूक आयोगाची भेट घेऊनच थांबले नाहीत। तर, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्याचीही संधी त्यांनी साधली। त्यांची ही भेट सदिच्छापर असो की, हेतुपुरस्सर असो, त्याला राजकीय परिमाण लाभणे स्वाभाविक आहे।

राज ठाकरे यांची दिल्लीची धाव प्रामुख्याने निवडणूक आयोगाच्या भेटीसाठीच होती,यात वाद नाही। मात्र ईव्हीएमविरोधातील आपली ही भेट ‘केवळ उपचार’ होती, हे राज ठाकरे यांनीच लगेच स्पष्ट करून टाकले। तसेच मतपत्रिकांद्वारे मतदान घेण्याच्या मागणी बाबत निवडणूक आयोगाकडून आपणास कुठलीही अपेक्षा, आशा वाटत नाही, असेही त्यांनी सांगून टाकले आहे। ‘पुढे काय करायचे, ते आपण मुंबईत परतल्यावर ठरवू’ हे त्यांनी दिल्लीत केलेले वक्तव्य सूचक आहे। राज ठाकरे यांना ‘ठाकरी’ भाषेचा आणि शिवसेना स्टाईलचा वारसा आहे। त्यामुळे ईव्हीएम हटवण्यासाठी त्यांच्या मनसेची पुढील ‘ऍक्शन’ काय असेल, याचीच उत्सुकता लोकांना आता राहणार आहे।

मात्र ‘मतदान पत्रिका नसेल,तर निवडणुका नाही’ अशी निर्णायक भूमिका घेण्याची तयारी किती पक्षांची राहील,हा प्रश्नच आहे। कारण ईव्हीएम कायम राहणार असेल तर निवडणुकांवर सरळ बहिष्कार टाकावा, अशी सर्व पक्षांना साद घालणारी भूमिका अलीकडेच वंचीत बहुजन आघाडीचे प्रणेते ऍड प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केली होती। पण तशी आर या पार भूमिका घेण्यास बरेच पक्ष कचरत आहेत। त्यांच्या अशा लेच्यापेच्या आणि कचखाऊ भूमिकेमुळे ईव्हीएम हटून मतपत्रिकांद्वारे मतदानाची पद्धत सुरू होण्याची शक्यता धूसर होत आहे।

मतदानाच्या पोचपावत्याची मोजणी करण्यास साफ नकार देण्याची निवडणूक आयोगाची भूमिका केवळ अनाकलनियच नव्हे, तर संशयास्पद ठरलेली आहे। सरकारचे बटीक होण्याचे धोरण निवडणूक आयुक्तांनी स्वीकारल्यामुळे त्या आयोगाची स्वायतताच संपल्यात जमा आहे। या परिस्थितीमुळे ईव्हीएम कायम राहणार असेल तर जनतेतील असंतोष आणि सरकार (मग ते कोणत्याही पक्षाचे असो) विरोधात केल्या जाणाऱ्या आघाड्या व्यर्थच ठरणार आहेत।

राज ठाकरे यांची निवडणूक आयोगाची भेट निव्वळ उपचार ठरल्यानन्तर त्यांच्या दिल्ली भेटीत राजकीय रंग त्यांनी सोनिया गांधी यांच्या घेतलेल्या भेटीने भरला, हेही तितकेच खरे। लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी मनसे- राज ठाकरे नकोच, अशी भूमिका घेतली होती। त्या पार्श्वभूमीवर, सोनिया गांधी यांनी राज ठाकरे यांना भेटीसाठी, चर्चेसाठी वेळ देण्याला विशेष महत्व आहे।
सोनिया गांधी आणि राज ठाकरे यांच्या भेटीवेळी राज्यातला कोणी काँग्रेस नेता तिथे उपस्थित होता, असे एखादे छायाचित्र बाहेर आलेले नाही। तसेच ही भेट घडवण्यात राजधानीतील कुण्या काँग्रेस नेत्याने महत्त्वाची भूमिका बजावल्याचेही समोर आले नाही। या भेटीमागे खरोखर तसे काहीच घडले नसेल तर राज्यातील काँग्रेसच्या धुरीणांना ती भेट ‘समजनेवालोको इशारा काफी’ याच सदरात मोडणारी म्हटली पाहिजे।


ता. क: सोनिया गांधी आणि राज ठाकरे यांची भेट आणि उद्याच्या 9 जुलैच्या (दलित पँथरचा वर्धापन दिन) निमिताने काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचे पिताश्री शंकरराव चव्हाण आणि नामदेव ढसाळ यांची आणीबाणीतली आठवण हटकून मनात जागली। ढसाळ यांनी पँथर बरखास्ती आणि त्यांच्या संघटनेतून केल्या गेलेल्या हकालपट्टी नन्तर दिल्लीत जाऊन इंदिरा गांधो यांची भेट घेत आणीबाणीला पाठिंबा जाहीर करून टाकला होता। ती भेट- मुलाखत दूरदर्शनवर प्रक्षेपित केली गेली होती। त्यांनतर ढसाळ हे मुंबईत पोहोचण्याआधीच त्यावेळचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण हे त्यांच्या स्वागताला विमानतळावर हजर झाले होते! इंदिरा गांधी यांच्या भेटीतून ढसाळ यांनी राजकीय बाजीच उलटवली होती। पँथर मधील गट बाजीत त्यांना अशा काळात कम्युनिस्ट ठरवले गेले होते, जेव्हा शिवसेना आणि कम्युनिस्ट यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला होता। अशा वेळी ढसाळ यांनी त्यांची केली गेलेली कोंडी इंदिरा गांधी यांच्या एका भेटीत फोडली होती।

Next Post

अमानुष गोळीबारात शहिद झालेल्या शहिदाना विनम्र अभिवादन.

गुरू जुलै 11 , 2019
घाटकोपर रमाबाई नगरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या भीमसैनिकांवर अमानुष, पाशवी गोळीबार करण्यात आला. 10 जण जय भीमचा जयघोष करत शहिद झाले…! डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्मितेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाचे पोलिस गोळीबारात बलिदान देणाऱ्या शहिद (शहिद भिमसैनिक नावे) १)शहिद-सुखदेव […]

YOU MAY LIKE ..