Leila” 2047 च्या काळात म्हणजे भविष्य काळात घडते.

Leila ही नेटफलिक्सवर नुकतीच आलेली 6 एपिसोड्सची सिरीज आहे.

या वेब सिरीज बद्दल नेटकरी भरपूर बोलत वा लिहीत आहेत …..विशेषतः धर्मांधता… जातीयवाद गरीब श्रीमंत आदी यावर पुरोगामी अन आंबेडकरी चळवळीतील क्रियाशील कार्यकर्ते… लेखक,पत्रकार आदी लोक भरपूर लिहीत आहेत …त्यातीलच आघाडीच्या पत्रकार जयश्री इंगले यांनी लिहीलेले स्पष्टीकरण त्याच्याच फेसबुक वाल वरून खास www.ambedkaree.com च्या वाचकांसाठी

“Leila” 2047 च्या काळात म्हणजे भविष्य काळात घडते.
आर्यवर्त’ नामक धर्मांध फॅसिस्ट राज्याची संकल्पना तेव्हा पूर्णपणे प्रत्यक्षात उतरलेली असते.
तेथील समाजाचे धर्मानुसार, जातीनुसार, सामाजिक आर्थिक कुवतीनुसार वर्गीकरण केल्या गेले आहे.
गरीब आणि श्रीमंत यांच्यातील विषमता चरम सीमेला पोहोचली असून त्याच्यासाठीं वेगवेगळ्या वसाहती वसवण्यात आल्या आहेत. आणि या वसाहतींना वेगळे ठेवण्यासाठी त्यांमध्ये उंच भिंतीचीे कुंपण बांधण्यात आली आहेत.
शुद्ध पाणी आणि स्वच्छ हवा आता विकत घ्यावी लागते.
ज्यावर केवळ आर्यावर्तीची मक्तेदारी आहे.
प्रदूषण पराकोटीला पोहोचल्यामुळे विषारी केमिकलयुक्त काळा पाऊस पडतो. गरिबांच्या वस्त्यांमधील नळात काळे पाणी येते.विषारी हवा आहे, कचऱ्याचे डोंगर आहेत.
याहून भयावह म्हणजे या आर्यवर्त देशात ‘जोशी’ नावाच्या हुकुमशाहाची दडपशाही सुरू आहे. इथे आंतरजातीय मिश्र विवाह हा फार मोठा गुन्हा आहे.
यातील मुख्य पात्र शालिनी (हुमा कुरेशी) जी आर्यवंशी आहे तिने एका मुस्लिम तरुणाशी विवाह केल्यामुळे शालिनीच्या घरात घुसून तिच्या डोळ्यादेखत कट्टर वादी आर्यावर्ती रक्षकांकडून तिच्या पतीला जीवानिशी मारले जाते. त्यांच्या 4/5 वर्षीय मुलीला ताब्यात घेऊन शालिनीला शुद्धीकरण /कल्याण केंद्रामध्ये पाठवलेे जाते. नाझी काँसंट्रेशन कॅम्पस सदृश्य या कॅम्पसमध्ये आंतरजातीय विवाह केलेल्या मुलींची महिलांची चित्तशुद्धी आणि शरीरशुद्धी केली जाते. प्रायश्चित्त म्हणून त्यांना अनेक प्रकारे टॉर्चर केले जाते. त्यांचे सम्पूर्ण ब्रेनवॉशिंग केले जाते.मिश्र विवाहामुळे गर्भवती असलेल्या मुलींचा जबरदस्ती गर्भपात केल्या जातो आणि त्यांच्या मिश्र वंशाच्या जीवित मुलांना आर्यावर्त संस्कार केंद्रांमध्ये भरती केले जाते. तान्ह्या मुलांच्या शुद्धीकरणासाठी मुलांचे परीक्षण केले जाते आणि या “मिश्रित रक्त” असलेल्या मुलांना पिंजर्यात नेऊन विकण्यात येते.
शाळा आणि संस्कार केंद्रांमध्ये त्यांच्या मेंदूवर आर्यवर्त हाच श्रेष्ठ वंश आणि केवळ “जोशी” हाच आपला मार्गदाता हे जबरदस्ती बिंबवले जाते.
त्यांना जोशीची थोरवी शिकवणारी पुस्तक आणि कथा सांगणारे सिनेमे दाखवले जातात.जोशीचे पुतळे, कटाऊट्स जागोजागी उभे दिसतात.

शुद्धीकरण आश्रमात, आंतरजातीय विवाहाचे प्रायश्चित्त म्हणून स्त्रीयांना कुत्र्याशी लग्न करण्यास भाग पाडले जाते, काहींना महंत पूजाऱ्यानी खाल्लेल्या उष्ट्या पत्रावळ्यांवर लोटांगण घालावी लागतात, त्यांचे मत परिवर्तन व्हावे म्हणून जबरदस्ती माईंड सप्रेसर गोळ्या दिल्या जातात.
कसेबसे या केंद्रातून पळ काढून शालिनी आपल्या मुलीला गरीबांच्या वस्त्यांमध्ये शोधते.
आर्यवर्त फौजेतील एक मुख्य गार्ड अधिकारी भानू (सिध्दार्थ) तिला शोधण्यासाठी एखाद्या आरोपीप्रमाणे तिचा पिछा करतो.
या गरिबांच्या वस्त्यांमध्ये तिला आत्यंतिक गरिबी , बकालपणा, पाण्यासाठी युद्धसदृश परिस्थिती आढळते त्याच प्रमाणे आर्यवर्ती राज्याविरुद्ध गुप्ततेने बंड करणारया काही गटांशी देखील ती संपर्कात येते.
पण शालिनीला केवळ आपली मुलगी शोधण्यात रस असतो. या दरम्यान भानू आणि त्याची टीम तिला पकडते आणि तिची रवानगी
श्रमदान केंद्रामध्ये होते. श्रमदान केंद्रातील महिलांना सेवक म्हणून आर्यावर्ती श्रीमंतांकडे पाठविले जाते. शालिनीची नियुक्ती आर्यवर्त राज्यातील एका प्रमुख व्यक्तीकडे सेविका म्हणून होते. तिथून तिला तिच्या मुलीच्या संदर्भात काही धागे दोरे गवसतात आणि आर्यावर्ती प्रमुख जोशी योजित स्कायडोम नामक एका आगामी भयंकर षड्यंत्राची तिला भनक लागते.
भानुच्या मदतीने तिला तिची मुलगी सापडते मात्र दोन वर्षाच्या काळादरम्यान ती आईला विसरली असते.
इथे हा पहिला सिझन संपवल्या गेला आहे.
या सिरीजच्या काही पॉझिटिव्ह बाजू:
1) आर्यावर्ती कट्टर राष्ट्राचे भयावह चित्र रंगवून ही कलाकृती अंतर्बाह्य हादरवून सोडण्यात निश्चितच सफल झाली आहे.
2) कलाकारांची निवड बऱ्यापैकी convincing आहे.
3) ‘फायर ‘ आणि ‘अर्थ’ दिग्दर्शित करणाऱ्या दीपा मेहताने दिग्दर्शित केलेले पाहिले दोन एपिसोड्स कथानकावर पकड ठेवतात. मात् तिसऱ्या एपिसोड पासून पवन कुमार आणि रामन हे दिग्दर्शक कथानकावर प्रभावीपणे पकड ठेवू शकले नाहीत
निगेटिव्ह बाजू:
1)तिसऱ्या एपीसोड पासून कथानक वहावत जाते. बऱ्याच घटना अर्धंवट पणे गुंडाळल्या जातात.
2) 2047 चा भविष्य काळ उभा करण्यात टेक्निकली निर्माते फेल झाले आहेत. केवळ बायोमेट्रिक ठसे आणि होलोग्राफिक प्रोजेक्शन पलीकडे काहीच टेक्नॉलॉजिकल प्रगती दिसत नाही. कथा आजच्याच काळात घडत असल्यासारखी भासते.
3)लीड रोल मध्ये हुमा कुरेशीने बऱ्यापैकी प्रयत्न केला आहे मात्र तिची व्यक्तिरेखा प्रखरपणे प्रभाव पाडत नाही. तिच्या व्यक्तिरेखेला मिळमिळीतपणे आणि ढोबळपणे लिहिल्या गेले आहे. आर्यावर्ती अधिकारी भानू म्ह्णून सिध्दार्थ प्रभावीपणे वावरतो मात्र त्याचीही व्यक्तिरेखाच मुळात ठिसूळपणे लिहिल्या गेलीय.
4)कल्याण केंद्राला एकीकडे शुद्धीकरण आणि धार्मिक संस्कार आश्रम म्हणून दाखवल्या जाते.मात्र तेथील तृतीय पंथी रक्षक आणि तिथे आणल्या गेलेल्या शिक्षित महिला एखाद्या सराईत गुन्हेगारां प्रमाणे अर्वाच्य शिवीगाळ करतात जे विचित्र वाटतं.
5)आर्यवर्त राज्यामध्ये केवळ हिंदू व्यक्तिरेखा दाखवल्या गेल्या. इतर धर्मीय लोक कुठे आहेत याचा थांगपत्ता लागत नाही.
6)बर्याचश्या घटना का दाखवल्या याचा काही संदर्भच लागत नाही.
7)नेटसीरिज मध्ये सेक्स शॉक फॅक्टर, न्यूडीटी , सेक्सची भरमार असते. या सिरीज मध्ये शॉक फॅक्टर आहे मात्र न्यूडीटी आणि सेक्स अजिबात नाही हे जाणतेपणे की अजाणपणे केल्या गेले असा प्रश्न पडतो.
8) सिरीज मधील संघटना, त्यांची कार्यशैली आणि काही व्यक्ती, आजच्या काळातील काही विशिष्ट संघटना आणि व्यक्तींशी साधर्म्य साधतात. त्यामुळे controversy होऊन सिरीज बॅन होणे टाळण्याकरिता ही खबरदारी घेतली गेली असावी असा अंदाज आहे.
एकंदरीत पहिला सिझनने बरेचसे प्रश्न अनुत्तरीत ठेवल्यामुळे दुसरा सिझन बघणं ओघाने आलंच.
‘जयश्री इंगळे’

Next Post

जयभिम ही धर्माधाष्ठित घोषणा आहे काय?

मंगळ जून 25 , 2019
आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ पत्रकार,संपादक मा गुणाजी काजीर्डेकर यांनी मोठ्या मनाने www.ambedkaree.com च्या वरिष्ठ सल्लागार संपादक म्हणून पदाचा स्वीकार केला. आता त्यांचे विशेष लेख www.ambedkaree.com च्या वाचकांसाठी उपलब्द करीत आहोत !,नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यानंतर नवनियुक्त खासदार यांनी वरीष्ठ सभागृहात ज्या गोपनीयतेच्या […]

YOU MAY LIKE ..