निखारे आणि कोळसे -गुणाजी काजीर्डेकर यांची लेखमाला

नुकतीच जेष्ठ नेते माजी न्यायाधीश मा बी जी कोळसे पाटील यांनी वंचित आघाडीवर काही आरोप केले .
पुरोगामीत्व आणि परिवर्तन यावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी वाचण्यासारखी जेष्ठ संपादक मा गुणाजी काजीर्डेकर यांची लेखमाला.

निखारे आणि कोळसे (भाग १)

परिवर्तनाचे आपण कसे खंदे समर्थक आहोत असे भासवित वास्तवापासून पळ काढणार्‍या न्या.कोळसेपाटील यांच्यातील तथाकथित पुरोगामी विचारवंताचा नकली मुखवटा जनतेसमोर आला, हे खूपच चांगले झाले. आंबेडकरी चळवळीला गतिमान करण्यात आपला कसा पुढाकार होता, किंबहुना जातीयवादी शक्तिच्या विरोधात लढून महामानवांचे विचार बहुजन वर्गापर्यंत नेण्याचे काम आम्ही केले. तथापि भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडीचे 12-12 उमेदवार जाहीर करून काँग्रेसला विरोध केला, यामागे अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे भाजपला छुपे समर्थन असल्याचा आरोप कोळसेपाटील यांनी केला आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय भूमिकेचा कल एकतर्फी असून भाजपच्या जातीयवादी विचारधारेला बढावा देणारे आहे, असा बी. डी. कोळसेपाटील यांचा तथाकथित आरोप आहे. काँग्रेसच्या निधर्मी, धर्मनिरपेक्ष प्रणालीला विरोध करून, महामानवांच्या विचारांशी गद्दारी केल्याचा ठपका येऊ नये म्हणून आपण वंचित आघाडी सोडून, काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे स्पष्टीकरणही केले. न्या. कोळसेपाटील यांना प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या जागांची मागणी अवास्तव वाटते. काँग्रेस ज्या जागा देईल त्या पदरात पाडून न घेता, आपले तेच खरे करण्याचा केलेला अट्टाहास होय, असा चुकीचा संदेश समाजात नेण्याचे काम कोळसेपाटील यांनी केले आहे. दोन दिवसांपूर्वी टाकलेल्या पोस्टमध्ये केलेल्या युक्तिवादाला दाद द्यावी अशीच आहे. “आपल्या या भूमिकेमुळे समाजात गैरसमज होण्याची शक्यता असून काही लोक विरोध करू शकतात. पण विरोध विचारांच्या पातळीवर व्हायला हवा.” असे सांगून हलकेच पाय काढू पाहतात.
कोळसेपाटील यांना एकाकी काँग्रेसबद्दल पुळका यावा? मंडल आयोगाच्या लढ्यात परिवर्तनवाद्यांच्या खांद्याला खांदा लावून लढलेल्या कोळसेपाटील यांना मंडल आयोगाचे खरे विरोधक कोण आहेत हे त्यांना माहीत नाही काय? मंडल आयोग म्हणजे ओबीसींच्या हक्काचा जाहीरनामा आहे. त्याला संविधानिक अधिष्ठान आहे, जो मानवमुक्तीच्या लढ्याचा एक भाग म्हणूनही पाहिले जाते. मंडल प्रश्नावर प्रारंभीच्या काळात जी आंदोलने झाली, त्याच्या केंद्रस्थानीआंबेडकरवाददीच होते,याची कोळसेपाटील यांनाही चांगली कल्पना आहे. तथापि मंडल लढ्याची धुरा नंतर ओबीसींनी आपल्या खांद्यावर घेतली. यामध्ये खा. दा. बी. पाटील (शेकाप), महाराष्ट्र राज्य ओबीसी संघटनेचे अध्यक्ष अॅड. जनार्दन पाटील, कृष्णकांत कुदळे, नेताजी गुरव, (सातारा), गजानन भोवड -कुर्ला चुनाभट्टी, गोविंदराव भोईर, (रेवदंडा), अशी भली मोठी यादी देता येईल. आंदोलनादरम्यान ओबीसींचे स्वयंघोषित नेते म्हणविणारे छगन भुजबळ, मुंडे कोणाची तळी उचलून धरत होते हे परिवर्तनवादी आणि ओबीसी जनतेला चांगले माहीत आहे. माजी प्रधानमंत्री व्ही.पी. सिंग यांच्याशी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रदीर्घ चर्चा झाली. मंडल आयोग लागू करण्यात आला खरा, पण त्यावर शिक्कामोर्तब झाले ते 9 जुलै 2013 रोजी! 1990 नंतर ओबीसीही आता रस्त्यावरची लढाई लढण्याची भाषा बोलू लागला तो कोळसेपाटील किंवा मुंडे-भुजबळ यांच्यामुळे नाही तर, याच काळात ओबीसींचे नवे नेतृत्व पुढे आले. त्यांनी मंडल आयोगाचा लढा काही प्रमाणातओबीसींच्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला हे वास्तव आहे. यामध्ये ओबीसी सेवा संघाचे प्रदीप ढोबळे, आगरी शेतकरी प्रबोधिनीचे अध्यक्ष राजाराम पाटील, जे वंचित आघाडीचे मावळ मतदारसंघाचे उमेदवार आहेत. (भाग १)

निखारे आणि कोळसे
(भाग २)

माजी न्यायमूर्ती कोळसेपाटील यांचा तथाकथित विधानावर अनेकांनी अभिप्राय दिले. आम्ही त्यांचा सन्मान करतो. याचा अर्थ ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खावा असा होत नाही. मागील भागात ओबीसींच्या सामाजिक आणि राजकीय परिवर्तनाच्या सहभागाची चर्चा केली. यामध्ये ओबीसींची तोफ असे वर्णन केले जात असे ते जगन्नाथ कोठेकर, डॉ. नरेंद्र दाभोलकर, अॅड.माधवराव वाघ, महादेव शिवगण, बाळक्रीष्ण नाटुस्कर, प्रा. श्रावण देवरे (नाशिक), यांनीही मंडल आयोगाच्या अंमलबजावणीचा आग्रह धरला. ( माझ्या आगामी “ओबीसी आहेत तरी कोठे? या ग्रंथात प्रदीर्घ चर्चा केली आहे) थोडक्यात रिडल्स प्रश्ननावर जे एकत्र आले, ते नंतर मंडलप् प्रश्नासाठी आग्रही बनले, त्यापैकी कोळसेपाटील एक होत. मराठा समाजाचे अनेक नेते, विचारवंत परिवर्तनाच्या प्रवाहात सामील झाले. न्या. पी.बी.सावंत, ब्रिगेडियर सुधीर सावंत हे मराठा समाजातून पुढे आलेले कार्यकर्ते,पण त्यांनी कधीही मराठा असल्याचा वृथा अभिमान बाळगला नाही, ना मराठपणासाठी लांगुलचालन केले! कोळसेपाटील कायदेतज्ज्ञ असल्याने परिवर्तनवाद्यांनी त्यांना डोक्यावर घेतले. पैसे देऊन त्यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली. परिवर्तनवाद्यांकडे खूप पैसे झाले म्हणून त्यांनी खर्च केले नाहीत, तर त्यामागे निराळा स्वार्थ दडला होता. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेपासून सत्तासमिकरणाची धुरा मराठा समाजाकडे आहेत. मराठा समाजाचे नेते, विचारवंत, साहित्यिक सर्वच महामानव फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांची बांधिलकी जोपासण्याची भाषा करतात, पण त्यांचे प्रेम कसे बेगडी आहे, हे नामांतर प्रश्नाने सिद्ध केले. अशावेळी कोळसेपाटील यांनी समता आणि सर्वसमावेशकतेसाठी बहुजनांपर्यंत विचार नेण्यासाठी मराठीपणाचा अंगरखा काढला काय? मराठा समाजाला सत्तेची सूज असल्याने डोळ्यावर धुंदी होती. परंतु ही नशा स्पर्धात्मक युगात आपोआप उतरली! ओबीसींच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा जातीश्रेष्ठत्वाचा अहंकार गळून पडला. मागासवर्गीयांना खालच्या पायरी आठवण करू देणार्‍यांवरच मागासवर्गीयांच्या रांगेत बसण्याची वेळ आली. आम्ही हा काळाने उगवलेला सूड आहे, असे कधीच म्हणणार नाही. प्रश्न आहे, मराठा समाज यापुढे कोणत्या पायरीवर बसणार याबाबतचा! अर्थातच ही पायरी कोळसेपाटील यांनी स्वतःहून दाखविल्याने पुरोगाम्यांचे बरेचसे काम हलके झाले. सहजता हा मनुष्याचा स्वभावधर्म असतो. कोळसेपाटील जितक्या सहजतपणे चळवळीत आले, तितक्याच सहजतेने ते बाहेर पडले आहेत. गेली दोन दशके ते धार्मिक दहशतवादावर बोलत आहेत. मात्र या दहशतवादाचे मूळ माहीत असतानाही, त्यावर उपाययोजना करावी असे का वाटले नाही? मागासवर्गीयांवर अत्याचार करणारा मराठा समाज हा देखील सांस्कृतिक दहशतवादाचा बळी आहे हे परिवर्तनवादी जाणून असल्याने त्यांनी आजवर विचारांची लढाई लढली. 2014 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुरस्कृत भाजपचे सरकार केंद्रात सत्तेवर आल्यानंतर समीकरणे बदलत गेली. अधिकार हातातून निसटल्यावर येणाऱ्या गुलामीची पहिल्यांदाच जाणीव झाली ती सर्वसामान्य मराठा समाजाला! याउलट सत्तालोभी भाजपच्या आश्रयाला गेले.

निखारे आणि कोळसे
(भाग 3 रा)

न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील यांनी अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे आंबेडकरी जनतेमध्ये नाराजी निर्माण होणे स्वाभाविक आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी हातमिळवणी करण्यामागे भाजपचा पराभव हा एकमेव अजेंडा होता. धर्मांध शक्तींना रोखणे या एकाच मुद्यावर बहुजनवादी एका विचारपीठावर आले होते. धर्मांध शक्तीमुळे देशात असहिष्णुतेचे वातावरण निर्माण झाले. 2015 ते 2018 या चार वर्षांत सामाजिक स्तर सतत दोलायमान झाला. धर्मप्रामाण्याने डोके वर काढले. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर लागोपाठ पुरोगामी, एवम् लोकशाहीवादी तत्वप्रणालीला मानणाऱ्या कार्यकर्ते, विचारवंतांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला हे वास्तव आहे. ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांचा पद्धतशीर काटा काढण्यात आला. भाजपने प्रत्येक मुद्दा प्रतिष्ठेचा केला. गोहत्या, गोवधबंदी, गोमांस विक्रीवर निबंध घातले. त्यासाठी कायदा तयार करण्यात आला. परंतु कार्यालयही ज्यांचा विश्वास नाही असे धर्माचे ठेकेदार संशयावरून लोकांना अडवून मारहाण करीत असल्याच्या घटना सोशल मीडियावर व्हायरल होताच, सत्ताधाऱ्यांचे खरे रूप कळाले. या घटनेवर पत्रकार गौरी लंकेश यांनी झोड उडवताच, त्यांची हत्या करण्यात आली. एक वर्षानंतर मारेकरी हाती लागले. त्यांनी गुन्हा केल्याची कबुलीही दिली. पण, एकालाही शिक्षा झालेली नाही. याच कालावधीत मराठा समाजाला जाग आली. चांदा ते बांद्यपर्यंत विखुरलेला मराठा समाज एकवटला. खरे तर अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी या गावातील एका मुलीवर बलात्कार झाल्यामुळे, प्रथमच मराठा समाजाला अस्मितेचा अर्थ कळला, आणि येथूनच मराठा समाजाला सामाजिक अधिकाराची जाणीव झाली हे वास्तव आहे. ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देत, अत्यंत शिस्तबद्ध असे 58 मोर्चे निघाले. गंमत अशी की, या मोर्चाची आखणी करणारे कधीच पुढे आले नाहीत. मात्र मोर्चेकऱ्यांचे ही मंडळी कौतुक करून त्यांचा हसला बुलंद करण्याचे काम करत असत, हे जनता बघत होती. कोणीतरी प्रकरण हे निमित्तमात्र ठरून, मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. मराठा समाजाला आर्थिकद्ष्टया मागास हा निकष लावून आरक्षणाची मागणी करण्यात आली. मुंबईत जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढण्यातआलल्यानंतर कोठे भाजपने मनावर घेतले! आणि मराठा आरक्षणासाठी गायकवाड आयोग स्थापन करून दोन महिन्यात मागासवर्गीय आयोग जो निर्णय देईल, तसे आरक्षण देण्यास सरकार बांधील असेल, अशी घोषणाच मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर झाडून सारे कलमकसाई कामाला लागले. राजर्षी शाहू महाराज यांनी दिलेल्या आरक्षणाचे दाखले देत, कलमबहाद्दर रकाने भरून काढत होते. त्यानंतर मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली. खरेतर हा अत्यंत घाईगडबडीत घेतलेला निर्णय होता, हे मराठा समाजाच्या लक्षात आले, पण तोपर्यंत वेळ निघून गेली असल्या कारणाने याचिका सादर करुन न्यायिक लढा देणे एवढेच हाती उरले! मागासवर्गीय आयोगाने लोकसंख्येच्या अनुसार 16 टक्के आरक्षणावर शिक्कामोर्तब करताच भाजपकडून मराठा आरक्षण प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. अर्थात हे आश्वासन दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी च केल्यामुळे विश्वास ठेवणे भाग पडले. काल गुरूवार दिनांक 21मार्च 2019 रोजी सकाळी 11 च्या सुमारास सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात राज्य सरकारला धारेवर धरताना, मराठा आरक्षण प्रश्नावर चुकीची माहिती पुरविल्याचा जो ठपका ठेवण्यात आला आहे. एवढे होऊनही मराठा समाज आजी माजी राज्यकर्त्यांवर विश्वास ठेवणार का? हा तो कळीचा मुद्दा आहे. मराठा समाजात कायदेतज्ज्ञ आहेत, त्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळेल की नाही, हे सांगण्यासाठीकायद्याच्या अभ्यासकांनी पुढे यायची तसदी घेतली असती तर कदाचित 58 मोर्चे काढण्याची मराठा समाजाला गरजच भासली नसती. ज्या समाजात न्या. बी. जी. कोळसेपाटील यांच्यासारखे कायदेतज्ज्ञ असतानाही इतरांच्या ओंजळीने पाणी प्यायची वेळ यावी?

निखारे आणि कोळसे
(भाग 4 था)

अॅड. बाळासाहेब आंबेडकरांनीच
मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला!

होय, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनीच सर्वप्रथम मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर अनेकांना कंठ फुटला! गुरूवारी सकाळी दिलेल्या निकालाकडे
वळणे मराठा समाजाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. मराठा आरक्षण प्रश्नावर सरकारने या समाजाच्या पाठीत एक प्रकारे खंजीर खुपसला असून, प्रचंड विश्वासघात केला असेच म्हणावे लागेल. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने दिलेल्या निकालात घेतलेला आक्षेप दुर्लक्षून चालणार नाही.

“सर्वोच्च न्यायालयाची लक्ष्मणरेषा ओलांडून मराठा आरक्षण देण्याचा प्रयत्न ” हा मथळा काय सांगतो?

न्यायालयाने घेतलेले आक्षेप पुढीलप्रमाणे

1) सर्वोच्च न्यायालयाने घातलेली 50 टक्के आरक्षणाची मर्यादा कुणीही ओलांडू शकत नाही
2) राणे समितीच्या आकडेवारीत प्रचंड विसंगती आहे.

3) 26 वर्षात एकाही राज्याने ही मर्यादा ओलांडली नाही. ज्यांनी ओलांडली त्यांना राज्य उच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवत निकाल रद्द केला.

4) महाराष्ट्र सरकारनेही ही लक्ष्मण रेषा ओलांडून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यामुळे सरकारचा हा निर्णय घटनाबाह्य ठरवून रद्द करण्याची विनंती मराठा आरक्षणाला विरोध करणार्‍या याचिकाकर्त्यांनी बुधवारी उच्च न्यायालयाकडे केली. तर निवृत्त न्यायमूर्ती एम.जी.गायकवाड आयोगाने माहितीच्या आधारे मराठा आरक्षणाची शिफारस केली ही बाब धोकादायक असल्याचे मतयाचिकाकर्त्यांने व्यक्त केले आहे.

5) संजय शुक्ल यांनी ही याचिका दाखल केली असून, याचिकाकर्त्यांचे ज्येष्ठ वकील अरविंद दातार यांनी
युक्तीवाद करून, मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याचे निदर्शनास आणले!

थोडक्यात मराठा समाजाची ही उपेक्षा आजकालची नसून, संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेपासून सुरू आहे. सामाजिक स्तरावर ओबीसी, अनुसूचित जाती/जमाती, भटक्या विमुक्त जाती, मुस्लिम समाजातील मागासवर्गीय जाती, याबरोबरच आदिवासी, भिल्ल, कोळी, टोकरेकोळी , ढोर, माकडवाले, जिनगर, मदारी या जाती प्रवाहात कधीच आल्या नाहीत, ना आणण्याचा कोणी प्रयत्न केला. अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी या सर्व वंचितांना एका विचारपीठावर आणून त्याच्यातील स्वाभिमान जागा केला. वंचित समाजात हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच चार पुस्तके शिकले. याचा अर्थ हे घटक खूप पुढे गेले असा होत नाही. संविधानाने त्यांना मुलभूत हक्क व अधिकार मिळाले असले तरीही अनेक गोष्टींमध्ये ते आजही कोसो दूर आहेत. त्यांचे संघटन करून सत्तेच्या प्रवाहात आणणे हा काय गुन्हा ठरतो ? सर्वात कळस म्हणजे महाराष्ट्र सरकारने गायकवाड आयोगाने दिलेल्या शिफारशीनंतर घाईघाईत घेतलेला 16 टक्के आरक्षणाचा निर्णय! हा निष्कर्ष राणे समितीने 2013 मध्येच काढला होता. मग फडणवीस सरकारने मराठा आरक्षण प्रश्नावर नवीन काय साध्य केले हा प्रश्न उपस्थित होतो. भविष्यात असा प्रश्न उद्भवल्यास त्याचे एका वाक्यात उत्तर देता येईल, “काँग्रेसच्या शिदोरीवर भाजपाने उपवास सोडला!”

Next Post

सोलापूर येथे ऐतिहासिक गर्दी ......लोकसभेकरीता सोलापुरात अड प्रकाश आंबेडकरांनी अर्ज भरला

सोम मार्च 25 , 2019
सोलापूर येथे ऐतिहासिक गर्दी …… वंचित बहुजन आघाडीचे नेते अड प्रकाश आंबेडकर आज आपल्या लोकसभेच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास जात आहेत त्यांचे ढोल तासे तसेच विविध वाद्य आणि मोठा जनसागर लोटला आहे . एखाद्या उमेदवार आपला अर्ज भरण्यासाठी जात असताना त्यांना […]

YOU MAY LIKE ..