महाराष्ट्रात – बसपा आणि -मायावती चालतात पण -प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा पक्ष चालत नाही !!

सत्तापटा मधले सोनिया गांधी ,काँग्रेस आणि शरद पवार यांचे दुतोंडी राजकारण आणि इथला बहुजन समाज.

 

महाराष्ट्राचे राजकारण आणि कॉंग्रेस -राष्ट्रवादी
कॉंग्रेसला सोनिया गांधींच्या पंतप्रधान पदाला विरोध करणारे शरद_पवार आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस चालते पण एमआयएम चालत नाही.

शरद_पवारांना महाराष्ट्रात – बसपा आणि -मायावती चालतात पण
-प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा पक्ष चालत नाही !! – हे कसे काय ? मला पडलेला एक साधा प्रश्न…. !!

आपण सर्वांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे कि , आज १९९५ पेक्षाही भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे . प्रतिक्रांतीतून लोकशाहीचा आधार घेत उदयास आलेल्या धर्मांध शक्तींनी अठरापगड जातींना धर्माच्या नावाखाली एकत्र आणून त्यांच्यावर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यांच्या या मगर मिठीतून “मराठा मतदार” आज निसटण्याच्या मार्गावर आहे , नव्हे तो निसटलेलाच आहे. त्याचे कारण मराठानेत्यांच्या सत्ताभ्रष्ट होण्यात आहे कारण राजकीय दृष्ट्या हा समाज नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. ब्राह्मणवाद्यांनी आपल्याला सत्तेतून पायउतार केले हे त्यांचे शल्य आहे.

अशा परिस्थितीत लोकशाहीविरोधी पक्षाला रोखण्यासाठी लोकशाहीवादी पक्षांनी आणि जनतेने एकत्र येणे गरजेचे आहे .यासाठी केवळ वंचितांची आघाडी अवसान घातकी लोकांमुळे यशस्वी होणार नाही, कारण घर के भेदी सर्वच समाजात आहेत त्यांना वेळेचे गांभीर्य कळत नाही पण माझ्या दृष्टीने जे जे नेते आणि त्यांचे घटक पक्ष या आघाडीसोबत आहेत त्यांनी एकत्र येऊन भाजपविरोधी लढाईला प्रारंभ केला हे मला महत्वाचे वाटते.

या पूर्वी कधी “तिसरी आघाडी”, तर कधी “रिडालोस” या नावाने हेच प्रयोग महाराष्ट्रात झालेले आहेत या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांचा हा प्रयोग यशवी होणार नाही असा अनेकांचा कयास आहे कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना सोबत घेऊन आघाडी केल्याशिवाय २०१४ ची पुनरावृत्ती टाळता येणार नाही हे यामागचे वास्तव आहे पण याचा अर्थ ज्यांचे काँग्रेस -राष्ट्रवादीशी जुळणार नाही , त्यांना सोबत न घेणे पायावर दगड पडून घेण्यासारखे आहे . पूर्वी कॉंग्रेसला ” भाकप-माकप”चालत नव्हते आज “एमआयएम” चालत नाही कारण “एमआयएम”ने काँग्रेस -राष्ट्रवादीच्या “मुस्लीम” मतदारांना सुरुंग लावला आहे .

 

समाजवादी पक्षापेक्षाही एम आय एम त्यांना घातक वाटते म्हणून त्यांना “एमआयएम” सोबत नको आहे. यामुळे आपल्या पक्षांच्या अस्तित्वाला धोका होऊ शकतो हि त्यांची भाबडी समजूत आहे . वास्तविक मला यावेळी त्यांचे पक्षाचे अस्तित्व महत्वाचे वाटत नाहीत तर देशाचे सार्वभौमत्व महत्वाचे वाटते.

या देशाच्या छाताडावर संविधान आणि लोकशाहीविरोधी भाजपला बसविण्यात “एमआयएम”सारखा नव्याने चर्चेत आलेला पक्ष नव्हे तर काँग्रेस स्वता:च पूर्णतः जबाबदार आहे हे वास्तव सगळा देश जाणतो त्यामुळे आपले हे पाप धुण्यासाठी त्यांनी लोकशाही आघाडी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे पण त्यांच्या स्थानिक महाराष्ट्रीयन नेत्यांना अद्याप तशी समज आलेली दिसत नाही , मग त्यांनी पुढाकार घेण्याची वाट कोणी किती दिवस पहायची ? हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे.

महाराष्ट्रात आणि एकूणच देशभरात लोकसभा , विधानसभेच्या दृष्टीने काँग्रेसची अवस्था अत्यंत बिकट आहे पण पक्ष नेतृत्व समजून घ्यायला तयार नाही कारण त्यांना त्या त्या राज्यातील स्थानिक नेत्याकडून व्यवस्थित रिपोर्टिंग होत नाही. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर कॉंग्रेसला नेतृत्व, कार्यकर्ते आणि जनाधारच राहिला नाही . आजवर त्यांची सर्व दारोमदार “दलित-मुस्लीम” मतांवर होती आणि हिंदू मतदार त्यांच्याकडे केवळ मराठा जातीपुरता होता पण शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उदयानंतर बहुसंख्य “मराठा मतदार” त्यांच्याकडे गेला आहे. तर ओबीसी मतदार सेना-भाजपकडे गेला आहे. हि वस्तुस्थिती नाही काय ? अशा परिस्थितीत काँग्रेस अद्यापही सुधारायला तयार नाही . त्याचे कारण त्यांना सत्ता असली काय आणि नसली काय ? याचे गांभीर्य त्यांना आहे असे अद्याप तरी वाटत नाही .

आज काँग्रेसमध्ये अनेक गट झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्राचा , विदर्भाचा गडही त्यांना राखता आला नाही . नेत्यांची त्यांच्या मतदार संघावर पकड राहिली नाही. लढवय्या कार्यकर्त्यांची फौज त्यांच्याकडे नाही. अशा परिस्थितीत काँग्रेसचे फक्त एकच कर्तव्य उरते कि , त्यांनी “आघाडी” करून भाजपला शह द्यावा. खरे तर या प्रकरणात कॉंग्रेस नेतृत्वाचे धोरण संशयास्पद नक्कीच नाही . फक्त त्यांच्या व्यवहारात त्यांनी बदल करण्याची गरज आहे.

शरद पवार हे नेते पूर्णतः राजकारणी आहेत त्यांच्यावर भरवसा ठेवला जाऊ शकत नाही कारण ते कधीही सत्तेसाठी भाजप-सेनेसोबत जाऊ शकतात हे त्यांनी २०१४ लाही दाखवून दिले होते पण त्यांचा पाठींबा न भाजपने घेतला न सेनेने !! पण २०१९ मध्ये भाजप विरोधकांची सत्ता आली तर शरद पवार या सत्तेचे वाटेकरी होऊ शकतात कारण सत्तेशिवाय राहणे काय असते याचा त्यांना नेहमीचा अनुभव आहे .
या सर्व लढाईत संविधानवाद्यांनी कॉंग्रेसवर मात्र विश्वास ठेवायला हरकत नाही पण त्यांनी इतर नेत्यांवर अहंकारी , स्वाभिमानी असे आरोप न करता आपला स्वतःचा जुना साज उतरून , आपली गढी , वाडे सोडून पुढे येऊन समविचारी पक्षांशी आणि त्यांच्या नेत्यांशी खुलेपणाने बोलणे आवश्यक आहे. आणि त्यांनी ते करावे नव्हे केले पाहिजे नव्हे हि काळाची गरज आहे असे मला वाटते आता तर सुरुवात आहे , वेळ कुठे निघून गेलीय ? उगीचच कुणाला भाजपची “ए-टिम ” बी-टिम ” म्हणून हिणवण्यात काय अर्थ आहे. आणि लोकांनीही अशा वावड्या उठविणारांवर केसाइतकाही विश्वास ठेऊ नये कारण एकट्या काँग्रेस मध्ये भाजपला हरविण्याची ताकद नक्कीच नाही , किंबहुना त्यांनी त्या भ्रमातून बाहेर येणेच सर्वांच्या हिताचे आहे. नाही तर ” मला न तुला आणि घाल कुत्र्याला ” अशी संविधानवाद्यांची अवस्था होईल, हे या निमित्ताने समजून घेण्याची गरज आहे.
जाता जाता ………!,

मला एक प्रश्न पडतो कि , सोनिया गांधींच्या पंतप्रधान पदाला विरोध करणारे शरद_पवार आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस कॉंग्रेसला चालते पण – एमआयएम चालत नाही. आणि -शरद पवारांना महाराष्ट्रात – बसपा आणि -मायावती चालतात पण – प्रकाश_आंबेडकर आणि त्यांचा पक्ष चालत नाही…. !!

हे कसे काय ? या प्रश्नाचे उत्तर कुणी देणार नाही हे शोधण्याचा प्रयत्न आपण करावा .
-बाबा_गाडे , ज्येष्ठ पत्रकार , औरंगाबाद.

Next Post

आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ पत्रकार मान. दिवाकर शेजवळ यांचे नवीन पुस्तक प्रकाशनाच्या तयारीत.

शुक्र सप्टेंबर 21 , 2018
आंबेडकरी चळवळीतील दिग्गजांवर दिवाकर शेजवळ यांनी लिहिलेल्या ऐतिहासिक मृत्यूलेखांचा संग्रह लवकरच आपल्या भेटीला! दिवाकर शेजवळ. आंबेडकरी चळवळीतील नामवंत ज्येष्ठ पत्रकार. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या यंदाच्या समतानंद अनंत हरी गद्रे पुरस्काराचे मानकरी. दलितांच्या लढयांवर अधिकारवाणी प्राप्त झालेले लेखक. तीन दशकाहून अधिक काळ […]

YOU MAY LIKE ..