कोविडचं भय न बाळगता राबणारे नाउमेद होता कामा नयेत..!

वाशीचे कोवीड सेंटर सोई सुविधायुक्त.. हजारो पेशंट मावतील अशा त्या सेंटर मध्ये प्रत्येक वाॅर्डात 10/12 डॉक्टर नर्स रुग्णांच्या सेवेला तैनात होते.. रुग्णांच्या प्रत्येक हाकेला धावून जाणार्‍या नर्स असोत की तत्परतेने एखाद्या पेशंटला ऑक्सीजन लावणारे डाॅक्टर असोत, प्रत्येक जण कर्तव्य आणि जबाबदारीतून काम करत होते… त्यांच्या या काम करण्याच्या तत्परतेमुळेच रूग्णही पटापट बरे होत होते…हे आहे सुनंदा यांचं १४ दिवसांतलं निरीक्षण !

कोविडचं भय न बाळगता राबणारे नाउमेद होता कामा नयेत..!

आज एक महिना झाला. बरोबर आजच्या दिवशी गेल्या 27 एप्रिलला सुनंदा शेजवलकर वाशीच्या कोवीड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. हलका ताप आणि प्रचंड थकव्याचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला होता. जोखीम नको म्हणून सरळ कोवीड सेंटरला जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला व तो योग्यही ठरला.

रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्यामुळे घरात भीती तणाव दडपणचं वातावरण होतं. पती दिवाकर शेजवलकर पत्रकारितेत ! तसे कणखर ! तरीही प्रत्येक जण चेहऱ्यावर खंबीरपणाचा आव आणूनच वावरत होते. एकमेकाला धीर देत होते.

त्या दोन दिवसात आलेलं दडपण शब्दात नाही व्यक्त करू शकत.. दोघा बापलेकाने कागदपत्रांची पूर्तता करत मला कोवीड सेंटरपर्यंत साथ दिली. पण पुढचा लढा माझा होता….सुनंदा शेजवलकर सांगू लागल्या.

सुनंदा यांना स्वत:ला तीनेक दिवसातच बर वाटू लागलं होतं. पण सतत चेक करत असलेला ब्लड रिपोर्ट निगेटिव्ह आल्याशिवाय कुणालाही सोडणं शक्य नव्हतं.

त्यातच, चार दिवसांनी सुनंदा यांच्या मुलालाही त्रास सुरू झाला. त्याचाही रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला.. दिवाकरांसाठी तो अगदी कसोटीचा काळ होता…मनस्थिती भयंकर होती. अतिशय दडपण असूनही त्यांनी संयमाने परिस्थिती हाताळत मुलाला काही जिवलग मित्रांच्या विचाराने घाटकोपरच्या.. चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि डाॅक्टर.. डाॅ हरीश आहिरे यांच्या हाॅस्पिटलमध्ये एडमिट केले..

बायको वाशीला, मुलगा घाटकोपरला एडमिट..अतिशय
घालमेलीची परिस्थिती.. ह्यांना स्वतालाही काॅरनटांईन व्हाव लागलं होतं. त्या रात्री त्यांनी कशा जागून काढल्या असतील, हा विचारच माझ्या अंगावर शहारे आणत होता… सुनंदा सांगत होत्या.

विशेष म्हणजे घरी येईपर्यंत दिवाकर यांनी मुलाविषयी सुनंदा यांना काहीच कळू दिलं नाही. 11 मे ला त्या स्वत: व पाठोपाठ 15 मे ला मुलगा असे दोघेही बरे होऊन घरी आले, तेव्हा कुठे दिवाकर यांनी मोकळा श्वास घेतला. आता घर पुन्हा भरलं होतं.

14 दिवसांनी डिस्चार्ज मिळाल्यानंतर, आम्ही तिथल्या सगळ्या मेडिकल स्टाफला भरल्या डोळ्यांनी मनापासून सॅल्युट केला आणि त्यांना स्वताचीही काळजी घ्यायला सांगितली. पुढील दोन महिने आम्हालाही काळजी घ्यायला सांगून सर्वांनी हसत निरोप दिला…सुनंदा कोविड सेंटरची आठवण सांगताना भावूक झाल्या होत्या.

या जीवघेण्या आजारात ही जिवाची बाजी लावून रुग्णांची सेवा करणार्‍या तमाम डाॅक्टर नर्स आया त्याचबरोबर जेवण-चहा पुरवणारी मुलं, टाॅयलेटपासून संपूर्ण सेंटर रोजच्या रोज सॅनीटायझर टाकून धुवून काढणार्‍या मुaलांची मेहनत आणि धाडसापुढे मी नतमस्तक झाले, सुनंदा म्हणाल्या.

जेव्हा डोळ्याने पहातो, तेव्हाच आपले अनेक गैरसमज दूर होतात.. कोविड सेंटरला युवकयुवतींना जीवावर उदार होऊन दिवस-रात्र अथक काम करताना पाहून माझे डोळे अनेकदा डबडबले ! जाणीव झाली की डोक्यात खूप गैरसमज घेऊन वावरत असतो आपण आपल्या इवलुशा जगात ! कसलीही खातरजमा न करता समाजमाध्यमांतून आपण पाजळत असलेली नकारात्मकता या कोरोना योद्ध्यांना नाउमेद करणारी ठरू शकते, हे लक्षात येऊन अपराधीही वाटलं ! सुनंदा यांनी प्रांजळपणे कबुली दिली.

कोविडचं भय न बाळगता राबणारे नाउमेद होता कामा नयेत..!

मी तर म्हणेन, खाजगी बड्या रुग्णालयांच्या नादी न लागता,अशा जागतिक संसर्गाच्या संकटकाळात लोकांनी सरकारी यंत्रणांवरच विश्वास टाकून विसंबून राहायला हवं. इतक्या मोठ्या आपत्तीत काही उणंदुणं राहणार ; ते यंत्रणांच्या लक्षात आणून देऊन सुधारायला हवं. अधिक चांगलं होण्यासाठी सकारात्मक पाठपुरावा व्हायला हवा. पण आपल्यासाठी लढणाऱ्यांना कळतनकळत नाउमेद करता कामा नये. कोविड सेंटरमधून घरी परतताना कुठला धडा जर मी शिकले असेन तर तो हा ! सुनंदा शेजवलकर यांनी व्यक्त केलेली ही कृतज्ञतापूर्वक भावना अतिशय बोलकी आहे.

Next Post

मराठा आरक्षण :खा छत्रपती संभाजी राजे व ऍड प्रकाश आंबेडकर यांची पुण्यात भेट..!

रवि मे 30 , 2021
दोन महापुरुषांच्या वारसांची एक ऐतिहासिक भेट: दोघांचे वैचारिक एकत्र येण्याची काळाची गरज!. सध्या मराठा आरक्षणाचा मुदा भलताच उग्र झाला आहे त्यात शाहू महाराजाचे वंशज श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले ह्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि जेष्ठ कायदेपंडित वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड […]

YOU MAY LIKE ..