‘गोदी मीडिया’ ही संभावना पत्रकारितेच्या अधोगतीची निदर्शक: नाना पटोले

मूकनायक शताब्दी सांगता सोहळा


‘गोदी मीडिया’ ही संभावना पत्रकारितेच्या
अधोगतीची निदर्शक: नाना पटोले

मुंबई, दि 1 फेब्रुवारी: आपल्या लोकशाहीचा डोलारा हा कायदेमंडळ, प्रशासन, न्यायसंस्था आणि मीडिया या चार स्तंभावर तरलेला आहे. त्यातील प्रत्येकावरील जबाबदारी आणि कर्तव्ये यांची पदोपदी जाणीव चारही स्तंभांनी ठेवण्याची गरज आहे, असे सांगतानाच हल्ली प्रसार माध्यमांची गोदी मीडिया अशी केली जाणारी संभावना ही पत्रकारितेच्या अधोगतीचे निदर्शक आहे, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी येथे केले. मुंबई मराठी पत्रकार संघात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘ मूकनायक’ पाक्षिकाच्या शताब्दी वर्षाच्या सांगता सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

वर्ल्ड बुद्धिस्ट अँड आंबेडकराईट मिशनने आयोजित केलेल्या या समारंभाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी पटोले आणि आठवले यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार, दैनिक ‘ नवराष्ट्र’चे सहाय्यक संपादक दिवाकर शेजवळ, मॅक्स महाराष्ट्रचे किरण सोनावणे, विजय मांडके यांचा मूकनायक सामाजिक पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

नाना पटोले आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायकमधून केलेली पत्रकारिता ही फक्त अस्पृश्य समाजाच्या जागृतीपुरती सीमित नव्हती. आजच्या लोकशाहीची समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुभाव ही मूल्ये रुजवण्यासाठी मशागत करणारी ती पत्रकारिता होती. तो वारसा पत्रकारांनी आजही पुढे चालवणे लोकशाही टिकवण्यासाठी गरजेचे आहे.

भेदभावाचे निर्मूलन म्हणजे आंबेडकर मिशन: आठवले


भारतीय संविधानाद्वारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यतेला, भेदभावाला कायद्याने हद्दपार केले आहे. मात्र त्या अनिष्ट गोष्टी काही अंशी मनांमध्ये कायम असल्याचे दिसून येते, अशी खंत व्यक्त करून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, भेदभावाचे निर्मूलन करून सगळ्यांची मने सांधणे, सर्व समाजाना जोडणे हेच खरे आंबेडकर मिशन आहे.

हेच काम बाबासाहेब आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी एकत्र येऊन एकेकाळी केले होते. पुढे खंडित झालेले ते काम गतिमान करण्याची गरज असून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती आणि भीमशक्ती यांच्या एकजुटीसाठी टाकलेली पावले त्याच दिशेने होती,असे प्रतिपादन आठवले यांनी यावेळी केले.

या समारंभाला बंगळुरूच्या नामा होमिओपॅथीचे संचालक डॉ रामप्रसाद मोरे, माजी आमदार जगन्नाथ शिंदे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे,वर्ल्ड बुद्धिस्ट अँड आंबेडकराईट मिशनचे अध्यक्ष ऍड प्रदीप जगताप, सरचिटणीस माजी सहाय्यक पोलीस आयुक्त साहेबराव सुरवाडे, कल्याण तालुका जर्नालिस्ट वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी पत्रकार सुदाम गंगावणे, रिपाइंचे नेते चंद्रशेखर कांबळे, उमाजी सपकाळे, सो. ना कांबळे, बहुजन संग्रामचे प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर, कवी वैभव कालखैर, माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे, संजय जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
●●●●●●●●●●●●●●●

Next Post

प्रेरणा!!! बोधिवृक्षाची

शुक्र फेब्रुवारी 5 , 2021
गार गार वारा आणि उंच उंच डोंगर रांगा सभोवार हिरव्या गर्द झाडीचे घनदाट तर काही तुरळक जंगल मधेच एकदा उजाड खुरट्या बुटक्या झाडांचा पुंजके असणारा माळरान….!गर्द झाडवलीत आणि गवताच्या घिरट्यात असलेली तर काट्याकुट्याने विस्कटून गेलेली पायवाट….!रानकोंबड्या,कावळे,कबुतरे,कवड्या ,चिमणी,फुलपाखरे,अवतीभवती घिरट्या घालणारे रानकिडे, डोक्यावर […]

YOU MAY LIKE ..