कोण आहेत डॉ. आनंद तेलतुंबडे ?- एक लढवय्या आंबेडकरी -वाचा सविस्तर

देशातील फॅसिस्ट राजवट आनंद तेलतुंबडे यांना संपवू पाहतेय आपण त्यांना वाचवूया !
——————————————-

डॉ. आनंद तेलतुंबडे, आंतराष्ट्रीय ख्याती प्राप्त विद्वान, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते यांच्या डोक्यावर सध्या UAPA सारख्या कठोर अन खतरनाक कायद्या अंतर्गत अटक होण्याची टांगती तलवार आहे.
त्यांनी मदतीसाठी आर्त हाक दिली आहे.



कोण आहेत डॉ. आनंद तेलतुंबडे ?

यवतमाळ जिल्ह्यातील राजूर या गावात “भूमिहीन दलित मजुरांच्या” पोटी जन्मलेले आनंद हे आठ भावंडांमध्ये सर्वात थोरले. बाबासाहेबांच्या चळवळीने प्रेरित झालेल्या आनंद च्या अशिक्षित आई वडिलांनी मुलांना शिकवण्याचा ध्यास घेतला व अत्यंत दारिद्रय़ात जीवन कंठीत, हाताला मिळेल ती मजुरी करत त्यांनी मुलांना शिकवलं. घरात सर्वात मोठा असल्यामुळं आनंद यांना उदरनिर्वाहासाठी आई वडिलांना मोलमजुरी मध्ये हातभार लावत शिक्षण घ्यावं लागल. एव्हढ्या हलाखीच्या परिस्थितीत देखील पहिली पासून वर्गात पहिला क्रमांक पटकावणारा आनंद एक “मेरिट होल्डर” म्हणूनच गौरविला गेला. सातवी पर्यंतच शिक्षण राजुरीत झाल्यावर मग दहावी पर्यंतच शिक्षण वणी या तालुक्याच्या ठिकाणी झालं. नागपूरच्या विश्वेश्वरैया इंजिनियरिंग कॉलेज मधुन मेकेनिकल इंजिनिअर ची डिग्री घेतल्यावर आनंद यांनी आय.आय.एम, अहमदाबाद या भारतातील सर्वश्रेष्ठ इन्स्टिटय़ूट मधुन मेनेजमेंट ची पदवी हासिल केली तर मुंबई विध्यापिठातून सायबरनेटिक्स या विषयावर पीएचडी मिळवली. २०१४ साली त्यांना कर्नाटक विध्यापीठाने D.Litt (डॉक्टर ऑफ लिटरेचर) ही पदवी देवून सन्मानित केलं.

अभ्यासात तेज असलेले आनंद एक “पुस्तकी किडा” बनून मात्र राहिले नाही तर जातीय संघर्ष व वर्ग संघर्ष या दोन्ही बाबत नेमकी जाण असलेला, निडर स्पष्टवक्ता असा एक चांगला कार्यकर्ता म्हणून नावारूपाला आले.

भगतसिंग यांना बालपणा पासून हिरो मानणाऱ्या आनंदने धर्मांध शक्तीविरोधात लढण्याची धमक लहानपणीच दाखवली.इयत्ता नववीत असताना वणी या तालुक्याच्या शाळेत, शाळेच्या ड्रेस मधिल पांढरी नेहरू टोपी ऐवजी जेंव्हा पुढारलेल्या समाजाच्या मुलांनी “रा.स्व.संघ” ची “काळी टोपी” घालून शाळेत यायला सुरुवात केली अन ही मुलं मोठ्या घरातील असल्यामुळं मुख्याध्यापकानी ही त्यांना रोखलं नाही तेंव्हा आनंद यांनी काही मित्रांच्या मदतीनं एक योजना आखली. आनंदनी स्वतः पिक्चर चे होर्डिंग रंगवून कमावलेल्या पैश्यानी १०० “निळ्या टोप्या” विकत घेतल्या व त्या घालून त्यांच्या सोबतची मुलं शाळेत येवू लागली…रा.स्व.संघाची काळी टोपी शाळेतून हद्दपार झाल्यावरच त्यांनी डोक्यावरची निळी टोपी उतरवली.

इंजिनीअरिंग करत असतानाही आनंद विध्यार्थी संघटनेत सक्रिय होते त्यावेळेस विध्यार्थी यूनियन च्या मतदानात हजारेक मतांपैकी फक्त वीसेक मतं सोडली तर बाकी सर्व त्यांना मिळाली. एव्हढी प्रचंड लोकप्रियता होती त्यांची विध्यार्थी वर्गात.

याच दरम्यान आनंद ने कामगारांच्या प्रश्नांवर वाहिलेले “ठिणगी”हे मासिक चालविले.

उच्चविध्याभुषित असलेल्या आनंद ला विदेशात गलेलठ्ठ पगाराची नोकरी आरामात मिळाली असती. त्याच तोडीचे त्यांच शिक्षण आहे. त्यावेळी संबंध भारतातील आय.टी क्षेत्रातील २० नामवंतांमध्ये त्यांनी नाव कमवालं. मात्र, सामाजिक जाणिवेपोटी त्यांनी भारतात राहणंच पसंत केलं. अनेक नागरी हक्क संघटनांशी संबंधीत असलेल्या आनंद यांनी शेकडो सत्यशोधन समित्यांमध्ये सहभाग नोंदवला आहे.

११ जुलै १९९७ रोजी माता *रमाबाईनगर* घाटकोपर येथे घडलेल्या हत्याकांडाचे सत्यशोधन अवघ्या आठवडाभरात करून या पोलिसी अत्याचाराचं पोलखोल ज्या *लोकशाही हक्क संघटना” ने केली त्याचा आनंद भाग होते.

२९ सप्टें २००६ रोजी घडलेल्या “खैरलांजी” हत्याकांडाच ही सत्यशोधन तर त्यांनी केलंच केलं तर काळीज फाडणाऱ्या या हत्याकांडावर दोन जबरदस्त पुस्तकं लिहून या अत्याचाराला वाचाही फोडली व सत्ताधाऱ्यांच्या व प्रसारमाध्यमांच्या एकूणच दलित द्रोही, जात्यंध स्वभावालाही चव्हाट्यावर आणलं.

गुजरात दंगलीच्या (२००२) ऐण काळातच आनंद ने अहमदाबाद गाठलं सत्यशोधनासाठी.

लोकशाही हक्कांच्या संदर्भात बोलायचं झालं तर आणीबाणीच्या वेळी स्थापन झालेल्या ” कमिटी फोर प्रोटेक्शन ऑफ डेमॉक्रटिक राईट्स (CPDR)” या प्रसिध्द संघटनेचे ते राज्य महासचिव आहेत व KG to PG पर्यंतच शिक्षण सर्वांना समान अन मोफत मिळावं या साठी झगडणाऱया ” ऑल इंडिया फोरम फोर राईट टु एजुकेशन (AIFRTE)” या संघटनेच्या अध्यक्षीय मंडळाचे माननीय सदस्य ही आहेत.

नोकरी निमित्त देशभर वेगवेगळ्या तेल कंपन्यामध्ये फिरणाऱ्या आनंद ने पश्चिम बंगाल मधिल कंत्राटी कामगारांना संघटित करत, गुजरातेतील शेतमजुरांसोबत काम करत, राजस्थान मधिल मुस्लिम झोपडीधारकांमध्ये मिसळत, तमिळनाडू मधिल दलितांच्या समस्यांवर लढत, मुंबईतील विविध राजकीय संघर्षाच्या अनुभवातून तर नागरी हक्क संघटनेच्या सोबतीनं स्वतःमधिल कार्यकर्ता जिवंत ठेवला.

कार्पोरेट जगतात उच्चपदस्थ अधिकारी या नात्यानं थेट भांडवली जगताच्या पोटात काम करणाऱ्या आनंद ने त्याचवेळी भांडवलशाही विरोधात मूलभूत लिखाण करत भांडवली व्यवस्था पोसत असलेल्या सामाजिक विषमतेविरुद्ध आवाज उठवला व समाजाशी नाळ बांधून ठेवली.

२००१ साली त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची तेंव्हा उपलब्ध असलेली सर्व “भाषणं व लिखाण” यांना एकत्रित करून एका cd मध्ये संकलित करण्याचं मोलाचं काम केलं. बाबासाहेबांच्या विचारांचे अभ्यासक व संशोधक यांना डोळ्यासमोर ठेवून खाजगी वितरणासाठी आनंद ने बनवलेली ही cd खूप सोयीची ठरली.

कार्पोरेट जगतात काम करताना आनंद ने “BPCL” चा “एग्ज़िक्युटिव डायरेक्टर” पदापर्यंत पोहोचण्याची मजल मारली. त्यांची हुशारी व कुशाग्र बुद्धिमतामुळ त्यांना “पेट्रोनेट इंडिया” चे “CEO” बनवलं गेलं. पेट्रोनेट ही कंपनी भारतात व विदेशात पेट्रोलियम संबंधी पायभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम करते.

कॉर्पोरेट जगतातून बाहेर पडल्यावर आनंद ने काही वर्ष (२०१० ते २०१६) “आय.आय.टी” खरगपूर या नामांकित प्रौध्योगीकी संस्थेत प्राध्यापिकी केली व सध्या ते Goa Institute of Management येथे सीनियर प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. या इन्स्टिटय़ूट मध्ये Big Data Analytics चे व्यवस्थापन करण्यासाठीचा भारतातील पहिला वहिला पदव्युत्तर पदवी (post-graduation in management) चा अभ्यासक्रम सुरू करण्याचा (जून २०१८) मान आनंद ने पटकावला.

अमरावतीतील एका छोट्याशा गावातील दारिद्य्राने पछाडलेल्या दलित कुटुंबात जन्म घेतलेल्या आनंद ने आपल्या “अथक परिश्रमाने” कॉर्पोरेट जगतातच नव्हे तर मोठ मोठ्या शिक्षण संस्थातही आपला ठसा उमटवला अन हे सर्व करत असताना त्यांनी भारतातील जातिव्यवस्था, वर्गव्यवस्था व सांप्रदायिकता यांचं अगदी वस्तुनिष्ठपण विश्लेषण करणारी जवळ जवळ २६ पुस्तकं, अनेक लेख लिहिले. आनंद तेलतुंबडे यांचं हे अतुलनीय कर्तुत्व खरंतर सर्वांसाठीच एक प्रेरणादायक व कौतुकाची बाब आहे मग असं काय झालंय की त्यांच कौतुक होण्याऐवजी भाजपा सरकार त्यांना नक्षलवादी ठरवून UAPA सारख्या खतरनाक कायद्यांतर्गत आत टाकू पाहतंय ?

अनेक राष्ट्रीय व आंतरराष्टीय सन्मान मिळविलेल्या व सतत प्रकाशझोतात असलेल्या आनंदच्या जवळपास चाळीस वर्षांच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीत त्यांच्यावर एक साधा डागही नसताना, त्यांच्या संबंध लिखाणात व निस्वार्थ जनसेवेत तिळमात्र ही बेकायदशीर असं काहीही नसताना त्यांना कुठल्या आधारावर रा.स्व.संघाच फडणवीसी सरकार अडकवू पाहतंय ? ?

“काय आहे केस आनंद वर ?”

३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्याच्या शनिवारवाड्यावर “भीमा कोरेगांव ने दिलाय धडा …नवी पेशवाई मसनात गाडा…” ही टेग लाईन घेवुन *एल्गार परिषद* झाली अन दुसऱ्या दिवशी ०१ जानेवारीला भीमा कोरेगांव ला राज्यभरातून द्विशतकी महोत्सव साजरा करण्यासाठी आलेल्या दलितांवर भीषण हल्ला केला गेला. हा हल्ला पूर्वनियोजित होता याचे सज्जड पुरावे उपलब्ध आहेत तसंच हा हल्ला भडकविण्यामागे अट्टल गुन्हेगार, दंगेखोर मिलिंद एकबोटे व “त्याच्या बागेतला आंबा खाल्याने पुत्ररत्न प्राप्त होतो” असं बरळणारा मेंटल भिडे या दोघांचं नाव पुढे आलं आहे.

एका ठिकाणी भगवे झेंडे हातात घेवुन दलितांवर हल्ला होत असताना पाहून “रिपाई सेक्युलर” या पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष रविंद्र चंदने यांनी मध्यस्थी करून लोकांना वाचविण्याचा प्रयत्न केला ज्यात ते ही जबर जखमी झाले. भिडे व एकबोटे समर्थकांनी केलेल्या या हल्ल्याची चित्रफीत रविंद्र चंदने यांच्याकडे उपलब्ध आहे. त्यांनी पोलिसांत व भीमा कोरेगांव हल्ल्या प्रकरणी सरकार ने नेमलेल्या चौकशी आयोगासमोर सदर चित्रफीत पुरावा म्हणून सादर केली आहे.

या हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे ०२ जानेवारी २०१८ रोजी अनिता रविंद्र साळवे या भगिनींने या हल्ल्यामागे भिडे व एकबोटे असल्याची तक्रार शिक्रापूर पोलीस स्टेशन ला दाखल केली.

मात्र एकबोटे व भिडे हे दोघेही कट्टर हिंदुत्ववादी असल्यामुळं व येनकेन प्रकारे रा.स्व.संघाशी संबंधीत असल्यामुळं दोघांना वाचविण्यासाठी फडणवीसी सरकार ने कंबर कसली. त्यातल्यात्यात मनोहर उर्फ संभाजी भिडे हा तर मोदी व फडणवीसला गुरुस्थानी असल्यामुळ भिडेला या गुन्हय़ातून सहीसलामत सोडविण्यासाठी नवीन खेळी रचली गेली.

०२ जानेवारी लाच अक्षय बिक्कड व आनंद धोंड या दोघं ABVP वाल्यांनी जिग्नेश मेवाणी व उमर खालिद यांच्यावर एल्गार परिषदेत भडकावू भाषण केल्याची तक्रार पुण्याच्या डेक्कन पोलीस स्टेशन ला दाखल केली.

तर, ०८ जानेवारी २०१८ रोजी तुषार दामगुडे या भिडेच्या चेल्यानी विश्रामबाग पोलीस स्टेशन मध्ये कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांविरोधात भडकावू भाषणं, गाणी सादर केल्याची तक्रार दाखल केली.

भीमा कोरेगांवला दलित समाजावर एकतर्फी हल्ला झाला मात्र पोलिसांनी (अर्थात सरकार ने ही ) याला मुद्दामहून “दंगल” असं संबोधून या प्रकरणाला वेगळं वळण लावण्याच योजले. एकाच घटनेबाबत पुण्यातच तीन तीन FIR दाखल करण्याची पुणे पोलिसांची कर्तबगारी देखील एक सोची समझी चालच होती. मग साळवेताई ने केलेल्या प्रमुख FIR ज्यात भिडे व एकबोटे आरोपी होते त्या FIR ला दूर सारण्यात आले. अक्षय बिक्क्ड ने केलेल्या FIR मधुन विशेष काही हासिल होण्यासारखं नव्हतं कारण एल्गार परिषदेत झालेल्या सर्व भाषणांचे रेकॉर्डिंग पोलिसांच्याकडे आहे व मेवानी अन खालिद यांच्या भाषणांमुळे दुसऱ्या दिवशी दंगल (पोलिसांचा शब्द ) घडली हे सिध्द करने अशक्य आहे हे फडणवीसी सरकार जाणून होते.

म्हणून, पोलिसांनी भर दिला तो भिडेचा चेला व कट्टर माओवाद विरोधक तुषार दामगुडे यानं केलेल्या FIR वर. या FIR मध्ये माओवाद्यांचा उल्लेख असल्यामुळं पोलिसांना आपली नवीन खेळी खेळण्याची व भिडेला वाचवण्याची नामी संधी लाभली.

एल्गार परिषद ही माओवाद्यांच्या पैशातून घेण्यात आली असं म्हणत पोलिसांनी दामगुडेच्या तक्रारी मध्ये नाव असलेल्या सुधीर ढवळे याला मुंबईतून व या FIR शी व एल्गार परिषदेशीही दुरान्वयेही कोणताच संबंध नसलेल्या इत्तर चार जणांना दिल्ली व नागपूर मधुन अटक केली. दिल्लीतून अटक केलेल्या रोना विल्सनच्या कॉम्पुटर मधुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची “राजीव गांधी टाइप” हत्या करण्याचा डाव माओवाद्यांनी आखल्याचे पत्र मिळाल्याचं पोलिसांनी जाहीर केलं व भीमा कोरेगांव मधिल दलितांवर झालेल्या हल्ल्याबाबत च्या चौकशीला अलगद वेगळं वळण लावलं. पंतप्रधानावर हल्ल्याची योजना आखली हा आरोप लावल्यामुळे सर्व अटक लोकांवर “UAPA” लावण्यास सोपं झालं. या मांदियाळीत भिडेला आरामात बाजूला काढण्यात फडणवीसी सरकार यशस्वी झालं.

पोलिसांनी मग राहुल गांधी, दिग्विजयसिंग ई. ची नाव असणारी पत्र सापडल्याच जाहीर करण्याचा सपाटा लावला. ही पत्र कोर्टात देण्याआधी पत्रकार परिषदेत जाहीर करण्यास पोलिसांना अधिक रस होता हे ही दिसून आलं. अशाच पत्रांच्या अनुषंगाने मग इत्तर सहा जणांसोबत आनंदच्या घराचीही झडती घेण्यात आली. फरक हा होता की आनंद च्या घरी कोणीही नव्हतं. पुण्यातील पोलिसांनी जबरदस्तीनं वॉचमन कडून चावी घेवुन त्याचं घर उघडलं व त्यांना काय करायचंय ते केलं ( आधीच ठरवल्याप्रमाणे). झडती घेण्यासाठी पोलिसांनी पुण्याहून पंच घेवुन गेले. त्यावेळी मुंबईत असलेल्या आनंदच्या पत्नी रमाताई ने तडक गोवा गाठलं व सदर घटनेबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली.

ज्या पाच पत्रांच्या आधारे आनंदवर कारवाई केल्याचं पोलिसांनी जाहीर केलं त्यातलं पहिलं पत्र अडिशनल डायरेक्टर जनरल पोलीस परमिंदर सिंघ यांनी तीन दिवसांनंतर (३१ ऑगस्ट २०१८) पुण्यात पत्रकार परिषद घेवुन जाहीर केलं. ते “पत्र (क्रमांक ०१)” असं:

“एप्रिल २०१८ ला पॅरिस मध्ये जी कॉन्फरन्स झाली ज्यात आनंद ने हजेरी लावली..त्या कॉन्फरन्स च्या आयोजकांना (पॅरिस मधिल अमेरिकन विध्यापीठ) भारतातील माओवाद्यांनी पैसे पुरवून आनंदला त्या ठिकाणी आमंत्रित करण्यास सांगितलं”.

हे पत्र आनंदने “NDTV”कडून मिळवलं व त्या कॉन्फरन्सच्या आयोजकांना पाठवलं. सदर पत्र वाचून आयोजकांना धक्का बसला व त्यांनी एक खरमरीत पत्र पाठवून सर्व इत्यंभूत खुलासा केला व एक पत्र फ्रेंच वकालतीला ही पाठवलं. या पत्रात आनंदला कॉन्फरन्सला कसं बोलवण्यात आलं ..त्यांचा खर्च कोणी उचलला सर्व सर्व स्पष्ट करण्यात आलं आहे. आयोजकांकडून आलेला खुलासा घेवुन आनंद ने परमींदर सिंग विरोधात अब्रूनुकसान भरपाईचा दावा ठोकण्यासाठी फडणवीसी सरकारकडे परवानगी मागितली (सप्टें २०१८) जी अजूनही दिली गेली नाही.

पत्र क्रमांक ०२:
कोणीतरी…कोणाला तरी…कधीतरी लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की आय.आय.टी. मद्रास मध्ये आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल (APSC) आयोजित करण्याची जबाबदारी *कोणा आनंद* ने स्वीकारली होती (२०१५).

या पत्राला “आनंद ने कोर्टात दिलेलं उत्तर”-: मी त्यावेळेस मद्रास पासून २००० किलोमीटर दूर आय.आय.टी खरगपूर मध्ये शिकवत होतो. मला जर विध्यार्थी संघटना बांधायची हौस असती तर आय.आय.टी खरगपूर मध्ये बांधली असती. काहीही असो APSC च्या संस्थापकांना ही बातमी कळाल्यावर त्यांनी त्यांच्या संघटनेच्या निर्मितीमध्ये व कार्यामध्ये माझा काहीही सहभाग नाही असं लेखी निवेदन दिलं आहे.

“पत्र क्रमांक ०३:”

कोणीतरी …कोणालातरी …लिहिलेल्या पत्रात कोणा आनंद ने अनुराधा गांधी मेमोरियल कमिटी (AGMC) चांगली सूचना केल्याचं म्हटलंय.

“आनंदच उत्तर”: पत्रातला आनंद मीच आहे असं समजलं तरी लक्ष्यात घ्यावं लागेल की इत्तर सन्मानीय सदस्यांसोबत मी ही या ट्रस्ट चा एक सदस्य आहे. ही ट्रस्ट दहा वर्ष जुनी एक नोंदणीकृत संस्था आहे ज्यात अनेक आदरणीय सदस्य आहेत. माझ्या कामाच्या व्यापामुळे (दूर खरगपूर ला २०१० ते २०१६ व तद्नंतर गोवा मध्ये असल्यामुळं) मी या ट्रस्ट च्या मीटिंग मध्ये ही भाग घेता आला नाही.

“पत्र क्रमांक ०४:”

पुन्हा कोणीतरी …कोणालातरी लिहिलेल्या पत्रात कोणातरी आनंद बद्दल उल्लेख केला आहे की त्यानं गडचिरोली मधिल एन्काऊंटर चे सत्यशोधन करण्याची जबाबदारी घेतली आहे.

“आनंदच उत्तर:” या पत्रातील आनंदही मीच आहे असं एकवेळ मानलं तरी हे ही समजून घ्यावं लागेल की मी कमिटी फोर प्रोटेक्शन ऑफ डेमॉक्रटिक राइट्स CPDR या संघटनेचा जनरल सेक्रेटरी आहे व या संघटनेचं कामच आहे की जिथं जिथं मानवी हक्कांची पायमल्ली होते असा संशय येतो तिथं तिथं जावून सत्यशोधन करावं. मात्र हे ही तथ्य आहे की गडचिरोली एन्काऊंटर संदर्भात मी सत्यशोधन करण्यासाठी कोणतीही समिती गठीत केली नाही व अशा कोणत्या समितीत भाग ही घेतला नाही.

“पत्र क्रमांक ०५:”

कोणाच्यातरी कॉम्पुटर मधुन मिळालेल्या नोंदीवर असं लिहिलं होत की सुरेंद्र ने मिलिंद मार्फत रुपये ९०,०००/- आनंद ला दिले.

“आनंदच उत्तर:” हा दावा अगदी हास्यास्पद व किमान कल्पनाशक्ती चा मासला आहे कारण गेली कित्येक वर्ष मी दर महिन्याला एव्हढी रक्कम कर स्वरूपात भरत आलो आहे.

अशारित्या आनंद तेलतुंबडे यांनी त्यांच्यावर लावलेल्या सर्व आरोपांच जोरदार खंडन केलं.

आनंदवर पोलिसांनी लावलेले आरोप किती तकलादू आहेत हे कोणाच्याही सहजच लक्ष्यात येतं.

मग आनंदने असं काय केलंय की काहीही करून फडणवीसी सरकार त्यांना पंतप्रधान मोदीच्या हत्येचा कट रचण्याच्या गंभीर गुन्ह्यात UAPA सारख्या कायद्याखाली फसवू पाहतंय.

विकारी हिंदुत्ववादी शक्ती, नवउदारमतवादी धोरणामुळे सामान्यजनांचं होणार शोषण, श्रीमंत व गरीब वर्गांमध्ये अतिवेगाने वाढत जाणारी दरी अन या सर्वांना तोड देण्यासाठी वर्ग संघर्षाची गरज मात्र त्यासाठी आधी जातीअंताची निकड, सत्तालोलुप रा.स्व.संघाचं बेगडी देशप्रेम ई. ई. वरील आनंद च विपुल लिखाण व त्यासाठी त्यांचा सततचा कृतिशील प्रयत्न डोळसपणे पाहिला तर याचं नेमकं उत्तर सापडतं.

भारतातील जातिव्यवस्थेचा ऊहापोह करत भारतीय साम्राज्यवाद विरोधात लढा उभारण्याच्या कामात *जात* प्रमुख अडसर आहे म्हणून जातीअंत आधी करावा लागेल …आरक्षणामुळ जर जातिव्यवस्था मजबूत होत असेल तर आरक्षणाची व्यवहारता तपासावी लागेल कारण मग आरक्षणाचा फायदा पेक्षा तोटाच अधिक आहे असं जेंव्हा आनंद मांडतो तेंव्हा तो जातींचा उपयोग करूनच निवडून येण्याचं आराखडे बांधणाऱ्या सत्ताधारी वर्गाचा दुश्मन ठरतो.

नवउदारमतवादी हिंदुत्वाच्या सध्याच्या काळात समतेचा विचार कसा करायचा – या विषयावर आनंद ने लिहिलेल्या “रिपब्लिक ऑफ कास्ट” या चारशे पानी पुस्तकात त्यांनी मांडलंय की, “उदारमतवादी विचारसरणीने ने जे संकटांच थैमान घातलंय त्यामुळं माणसं स्वतःच्या नशिबात मनोवैज्ञानिक आधार शोधू लागली आहेत. ज्यामुळे धार्मिकता, कट्टरतावाद व अविचारीपणा जगभर वाढीस लागला आहे. भारतातील नवउदारमतवादामुळ हिंदुत्वाला उफान आलं आहे. ज्यामुळे हिंदुत्ववादी राजकीय पक्ष भाजपा कस्पटातून राजकीय सत्तेच्या मध्यभागी येण्याची मजल मारू शकला…हिंदुराष्ट्र काय आहे हे या विखारी विचारसरणीच्या संस्थापकांनी नमूद करून ठेवलं असलं तरी गुजरात मधिल दशकभरा च्या प्रयोगातून व दिल्लीतील गेल्या चार वर्षांच्या कारभारातून नरेंद्र मोदी ने त्याचा नमुना पेश केला आहे…दोन्ही महायुध्दाच्या दरम्यान उदयाला आलेल्या युरोपियन फासिस्ट राज्यांच्या समान हे हिंदू राष्ट्र संकल्पित केलं गेलंय….”

मोदी ने लावलेल्या GST वरील आपल्या अभ्यासपूर्ण लेखात आनंद ने संघपरिवाराचा आदर्श हिटलर च उदाहरण देवून स्पष्ट केलंय की हे देखील हिंदू राष्ट्रा कडं नेणार पाऊल कसं आहे.

जातिव्यवस्थेच्या इतिहासात ब्राह्मणी संहितेच्या विरोधात बेडरपणे उभं राहून जात विरोधी बंड करणाऱयांना अर्पित केलेलं एक जाडजूड पुस्तक “दि रेडिकल ईन आंबेडकर” आनंद ने सूरज ऐंगडे यांच्या सोबत संपादित केलं आहे. जगभरच्या लेखकांचे दर्जेदार लेख संकलित करून बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचारधारेची (आतापर्यंत फारसं लक्ष न दिलेल्या) मांडणी या अलीकडेच प्रकाशित झालेल्या पुस्तकात आहे. या पुस्तकात बाबासाहेबांनी केलेल्या बौध्द धर्मांतरावर आनंदचा महत्वपूर्ण लेख आहे ज्यात त्यांनी दाखवून दिलंय की बाबासाहेबांनी एका राजकीय क्रांतीची सुरुवात म्हणून कल्पीलेल्या बौद्ध धर्मांतराची त्यांच्या अनुयायांनी कशी वाट लावली आहे.

बाळ ठाकरेच्या मृत्यू नंतर त्याच्यावर स्तुतीसुमनं उधळण्याचा जो सपाटा चोहीकडुन सुरू झाला होता त्याचा खरपूस समाचार घेत बाळ ठाकरेची आंबेडकर द्वेषाने पछाडलेली, कामगार द्रोही व जातीयवादी विचारसरणी आनंद ने , “बाळ ठाकरेचा मृत्यू व आठवलेच दुख” हा लेख लिहून उजागर केली.

बाबासाहेबांच्या लिखाणातून अर्धवट संदर्भ घेवुन त्यांना मुस्लिम द्वेष्टे ठरविण्याचा रा.स्व.संघाच्या खेळी विरोधात आनंदने, “आंबेडकर ऑन मुस्लिम” हे पुस्तक लिहिलं जे खूप गाजलं ही .

“हिंदुत्व हा धर्म नव्हे तर ती एक जीवनपद्धती आहे, एक मानसिक अवस्था आहे” या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णया विरोधात आनंद ने , शमसुल इस्लाम व तिस्ता सेटलवाड सोबत याचिका दाखल केली होती.

“एकॉनमीक अँड पोलिटिकल वीकली” “(EPW)” या प्रसिध्द इंग्रजी साप्ताहिकात आनंद २०१० पासून नियमित स्तंभ लिहीत आलेत. त्यांचे हे लेख देशाच्या मुळप्रवाहापासून दूर राहिलेल्या लोकांच्या हितासाठी असतात.

मोदीच्या नावानं रा.स्व.संघ बहुमताने सत्तेत आल्यानंतर भारतीय लोकशाहीला जो धोका निर्माण झाला आहे त्याविरोधात हिंदुत्ववादी राजकारणाचा पर्दाफाश करणारे आनंद चे EPW मधिल लेख अधिकच धारदार झाले आहेत.

बाबासाहेबांना आपलंसं करण्याचा जो संघपरिवाराचा संधीसाधूपणा चालला आहे त्याबाबत आनंद लिहितात, ” बाबासाहेबांचे हिंदुत्वावरचे विचार पाहता ते संघाचे सर्वात मोठे शत्रू ठरत असतानाही ज्या प्रकारे संघाने त्यांना प्रातःस्मरणीय बनवलंय, एका मागून एक त्यांची स्मारकं उभारताहेत, बेशरमपणे त्यांना *”घर वापसी”* चा समर्थक सांगताहेत, हेडगेवार, विषारी विचारसरणीचे गुरु असलेले गोळवलकर, सावरकर ई. चे मित्र म्हणून बाबासाहेबांना दाखवताहेत, बाबासाहेबांनी त्यांची स्तुतु केली ई. ई. म्हणताहेत हा सर्व खटाटोप म्हणजे बाबासाहेबांची *स्मारकं बांधून* त्यांचे *विचार संपविण्याचा* संघ परिवाराचा एक *कुटील डाव* मात्र आहे. परंतु,स्मारकांच्या जल्लोषात बेभान झालेल्या आंबेडकरवाद्यांना हे दिसेनासं झालंय”.

“गाईच्या नावानं” माणसं मारण्याचं जे राजकारण हिंदुत्ववाद्यांनी चालवलंय त्याबाबत आनंद ने लिहिलंय, ” संविधान निर्मिती दरम्यान “बीफ बॅन” ला अधिकारात समाविष्ट करण्याची अतार्किक मागणी घटनासमितीतील सनातनी हिंदूंनी केली होती. पशूंच्या हक्कांना मानवी मूलभूत अधिकारांत समाविष्ट केल्यानं भारताची जगभरात जी नाचक्की झाली असती ती न होऊ देण्याचं श्रेय बाबासाहेबांना जातं . त्यांनी या मागणीला धुडकावून लावलं”… संघ परिवार किती दुतोंडी आहे हे दाखविताना आनंद ने मांडलं कि बिहार निवडणुकींवर डोळा ठेवून मोदी – शाह यांनी दादरी हत्याकांडाची नापसंती (मनाविरुध्द) एकीकडं व्यक्त केली तर दुसरीकडं रा.स्व.संघाच्या “पंचजन्य” मध्ये, ” गोहत्येचं पाप करणाऱ्याला मारून टाकण्याची आज्ञा वेदांनी दिली आहे” असं छापून आलं…. आनंद पुढे म्हणतात कि, “…याच्या मुळात हिंदुराष्ट्र स्थापन करण्याची यांची मंजुषा आहे…ब्राह्मणशाहीचे बळी ठरलेल्यानी एकजुटीनं यांच्या विरुद्ध आवाज उठविल्यास त्यांच्या मूर्खपणाचं हे दिवा स्वप्न निश्चित भंग पावेल.

“इशरतजहाँ” बनावट चकमकी वरील आपल्या लेखात आनंद ने मोदीची तुलना मुसोलिनी व हिटलरशी करताना दाखवून दिलं की सांप्रदायिक्त नव्हे तर ज्याप्रकारे मुस्लिम हत्याकांडाच्या घटना मोदी मुख्यमंञी झाल्यावर प्रस्तुत केल्या जायच्या अन ज्या तऱ्हेनं मोदी ने दुर्दैवी मुस्लिमांवर हिंदुत्ववादी गुंड मोकाट सोडले, ज्या नकारात्मक पध्दतिनं त्यानं सरकारी यंत्रणा राबविली, सर्व घटनांचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करून ज्याप्रकारे बनावट चकमकींना खुली छुट देवून “हिंदूहृदय सम्राट” अशी आपली छबी बनवली ते पाहून गुजरात मधिल मुस्लिमांना दंगा-मुक्त भविष्यासाठी त्याच्याशी समझोता करण्याशिवाय पर्यायच उरला नाही….भारतातील नवउदारमतवादी राज्य हे आधीच फासीस्म कडे झुकत चाललं असताना त्याला अधून मधुन संविधानाचा तोंडी लावण्यापुरता का होईना वापर करावा लागायचा…मोदी शिखरावर आल्यावर त्याचीही गरज भासणार नाही.

मोदीच्या “CASHLESS SOCIETY” ची खिल्ली उडवताना आनंद म्हणतो मोदीने आपल्या नाटकी कौशल्यानं लोकांना “डिजिटल इंडिया”, “मेक ईन इंडिया”, “स्टार्टअप इंडिया”, “स्वच्छ भारत”, “सबका साथ सबका सबका विकास” ई. स्लोगन देवून मोहित केलं मात्र आपल्या कार्यकाळाच्या मध्यात पोहोचले तरी एकही वचन पुर्ण करता नाही आलं. नोटबंदीच्या भयंकर प्रभावातून लोकांचं लक्ष हटविण्यासाठी मग त्याने cashless society ची घोषणा केली. ८ नोव्हेंबर २०१६ ला नोटबंदीची घोषणा करतेवेळी मोदीच्या मुखातून १८ वेळा “काळा पैसा” हा शब्द बाहेर पडला, cashless हा शब्द एकदाही नाही म्हटला. मात्र २० दिवसांनंतर *मन की बात* या कार्यक्रमात बोलताना काळा पैसा हा शब्द फक्त ९ वेळा तर cashless हा शब्द तब्बल २४ वेळा उच्चारला.

“गौरी लंकेश” यांच्या निर्मम हत्येविरुद्ध लिहिताना आनंदने “सनातन संस्थेचा” संपूर्ण इतिहास, त्यांची रचना, कार्यपद्धती, दैवी राज्य आणण्यासाठीची त्यांची व्यूहरचना, त्यासाठी “विचारवंतांना राक्षस” ठरवून त्यांना मारून टाकण्याची योजना या सर्व बाबी उजेडात आणल्या आहेत. तसेच उमर खालिद यांच्यावर झालेल्या अयशस्वी जीवघेण्या हल्ल्यालाही सनातन च तिरस्कार करण्याचं राजकारण हेच कस कारणीभूत आहे हे सिद्ध करताना आनंद ने म्हटलंय कि हिंदुत्ववाद्यांचं हे “तिरस्काराचं राजकारण” एकदिवस भारताचा घात करेल.

“नोटबंदी” बाबत आनंद म्हणतो कि “काळा पैसा, आतंकवाद व बनावट नोटा” या विरोधातील मोहिमेची नौटंकीमुळे भाजपाची राजकीय अयोग्यता व मोदीचा अहंकारी *मी पणा* पुरता चव्हाट्यावर आला आहे. काळा पैसावाल्याना पकडणं तर दूरच राहील, नोटबंदी ने काळा पैसा बनविण्याचे ईत्तर मार्ग उपलब्ध करून दिलेत.

“रोहित वेमुला” च्या संस्थात्मक हत्येविषयी आनंद म्हणतो कि, “रोहित वेमुला च्या केस ने मूळ प्रश्न जो समोर आणला आहे तो हा आहे कि या “देशामध्ये कायद्याचं राज्य आहे कि नाही”. रोहित ला मिळत असलेल्या तुटपुंज्या फेलोशिप मधुन तो काही पैसे आईला पाठवायचा व त्यातनं ती गुजराण करायची हिच काय ती तिची चूक. नाहीतर ती जर पैसेवाली असती तर रोहितला आत्महत्या करण्यास भाग पाडणारे सर्व दोषी ज्यांची नावं FIR मध्ये आहेत आज अटक असते.

“मोदीच्या” बहुचर्चित आयुष्मान योजनेबाबत सखोल उहापोह करत आनंदने मांडलंय कि या योजनेमुळे सरतेशेवटी सरकारी खजिन्यातील मजबूत पैसा खाजगी विमा कंपन्या व खाजगी हॉस्पिटल्स यांच्याच घशात जाणार आहे.

आनंदच्या लिखाणातील वरील काही “मासलेवाईक” उदाहरणं पाहिली तर लक्ष्यात येत कि सत्ताधारी का त्यांना संपवू पाहताहेत. हि “फॅसिस्ट रासवट” तुमच्या हातातील शस्त्रांना घाबरत नाही तर तुमच्या डोक्यातील समतावादी विचारांना घाबरते म्हणूनच त्यांना काहीही करून आनंदची “बोलती बंद” करायची आहे मात्र तसं होऊ न देणे आता सर्वस्वी आपल्या हातात आहे. लोकशाहीवादी, समतावादी समस्त लोकांनी एकत्र येऊन या संकटाला तोंड द्यावं लागेल. “आनंद तेलतुंबडे यांना एकटं पडू देणं हि आपली घोडचूक ठरेल.”आपल्याला काही प्रश्न जाहीरपणे विचारावे लागतील:

१) ०१ जानेवारी २०१८ रोजी भिमाकोरेगाव ला जो हिंसाचार झाला त्याची चौकशी करण्यासाठी शासनाने कलकत्ता उच्चं न्यायालयाचे निवृत न्यायाधीश जे.एन.पटेल व महाराष्ट्राचे माजी मुख्यसचिव सुमित मल्लिक या दोघांचा चौकशी आयोग नेमला आहे. सदर आयोगाचं कामकाज सुरु असताना व हा हिंसाचार कोणी घडविला हे अध्यापही निष्पन्न झालं नसताना पुण्याचे पोलीस कुठल्या आधारावर आनंद तेलतुंबडे यांना या हिंसाचारासाठी जबाबदार धरताहेत ? पोलिसी दडपशाहीचा हा कळस नव्हे काय ?

२) ३१ डिसेंबर रोजीच्या शनिवारवाड्यावरील एल्गार परिषदेच्या एकूण आयोजनाबाबत मतभेद असल्यामुळं आनंद तेलतुंबडे त्या परिषदेकडं फिरकलेच नसताना त्या परिषदेत झालेल्या भाषणांबाबत सरकार आनंद तेलतुंबडे यांना कसं दोषी धरू शकतं ?

३) पंतप्रधान मोदीला मारण्याचा कट रचल्याचा “आव” आणणाऱ्या पोलिसांना नावानिशी लिहिलेल्या एका पत्राव्यतिरीक्त पुढे काहीच तपास करता आला नाही..असं का ? त्या पत्राच्या आधारे अधिक काहीच पोलिसांना आतापर्यंत उघड करता आलं नाही कारण सत्यार्थी तसं काहीच नाही. म्हणजे, हि फक्त फडणवीसी सरकारने रचलेली एक पोलिसी खेळी आहे..असंच ना ?

४) “आनंद” हा शब्द असलेली पाच पत्र माओवाद्यांची म्हणून पोलिसांनी पुढे आणली. आनंद म्हणजेच आनंद तेलतुंबडे असा जावई शोध हि पोलिसांनी लावला मात्र ती पाचही पत्र चुकीची व बनावट असल्याचं सिद्ध झालं आहे तरी पोलीस आनंद तेलतुंबडे यांना का दोषी मानतय ? केवळ आकसबुद्धीनेच ना ?

५) पॅरिसच्या कॉन्फरन्स बद्दल पोलिसांनी जे बनावट पत्र जाहीर केलं त्याबाबत सविस्तर खुलासा करणारं पत्र पॅरिस कॉन्फरन्स च्या आयोजकांनी आनंदला व फ्रेंच वकालातील पाठवल असतानाही राज्यसरकार आनंदला पोलिसांवर अब्रुनुकसान भरपाईचा दावा ठोकण्याची परवानगी का देत नाही ? सरकारचं पितळ उघडं पडेल म्हणूनच ना ?

६) साधी चॅप्टर केस असलीतरी सरकारी नोकरी मिळत नाही. असं असताना सरकारी कंपनीत अतिउच्च पदापर्यंत पोहोचलेले आनंद तेलतुंबडे हे माओवादी या बंदी घातलेल्या संघटनेचे सदस्य कसे ?

७) अक्षरश: थातुर-मातुर कारणं पुढे करून आनंद तेलतुंबडे वर UAPA अंतर्गत कारवाई मात्र शस्त्रांचा मोठा साठा घरातून जप्त केलेल्या भा.ज.पा च्या पदाधिकारीवर UAPA नाही असं का ? भा.ज.पा चा पदाधिकारी व त्यातही कुळकर्णी म्हणूनच ना ?

८) शस्त्रांचा मोठा साठा घरात बाळगणे बेकायदेशीर नाही …दहशतवादी नाही मात्र सरकारच्या जनविरोधी कार्यपद्धतीवर टीका करणं हे दहशतवादी आहे का ?

९) १९६७ साली जन्माला आलेल्या UAPA कायद्याअंतर्गत अटक करण्यात आलेल्या केसेस मध्ये आतापर्यंत ७० टक्के लोक निर्दोष सुटली आहेत. या कायद्याचा गैरवापर सत्ताधारी आपल्या विरोधातील आवाज दडपण्यासाठीच सर्रास करतात. निर्दोष मुक्त झालेल्या लोकांच्या आयुष्यातील मूल्यवान ४ ते ५ वर्ष विनाकारणच जेल मध्ये वाया जातात. आनंद तेलतुंबडे यांच्यावर बिनबुडाचे आरोप लावून त्यांच्या आयुष्यातील काही वर्ष अशीच जेल मध्ये सडवायची जेणेकरून ते आपल्या लिखाणातून व सामाजिक कृतीतुन सर्वसामान्यांच्या प्रश्नाला जे हात घालीत आहेत, सर्वशक्तिमान हिंदुत्ववादी फॅसिस्ट राजवटी विरुद्ध आवाज बुलंद करून लोकशाही वाचवू पाहताहेत ते फडणवीसी सरकार ला होऊ द्याचे नाही. या एव्हड्या कारणासाठीच आनंद तेलतुंबडे यांना जेरबंद करण्याचा डाव आखला गेलाय ना ?

१०) सर्वसामान्यांची गाऱ्हाणी जगासमोर मांडणाऱ्या आनंद तेलतुंबडे सारख्या आंतराष्ट्रीय ख्यातीप्राप्त विचारवंतांच्या शब्दाला मान असतो म्हणून एकदा आनंदचाच गळा आवळला तर सर्वसामान्यांना चिरडणं काही मुश्किल नाही हिच सरकारची भूमिका आहे ना ?

‘विषमतावादी व्यवस्थेविरुद्ध कृती करण्याऐवजी आनंद तेलतुंबडे जर भांडवली व्यवस्थेचे पाईक बनून राहिले असते. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक ई. वर होणाऱ्या अन्याय-अत्याचारांकडे डोळेझाक करत जर शासनाची “जी-जी” करत राहिले असते तर याच मोदी सरकारने त्यांची किमान राज्यसभेवर खासदार म्हणून तरी निश्चित वर्णी लावली असती, बाबासाहेबांच्या नातं-जावयाचा सन्मान करण्याचं निमित्त साधून (दलित समाजाला गंडवायच्या उद्धेशाने)

स्वतःचे खिसे भरत छानशौकीचे जीवन जगण्याचं टाळत सर्वसामान्यांच्या दुःखाशी समरस होत आनंद तेलतुंबडे एक समतावान, निकोप समाजाचं स्वप्न पाहत होते/ आहेत…त्याचीच त्यांना हि जबर किंमत मोजावी लागत आहे.
‘आपण काय करायचं?”
आनंद तेलतुंबडें यांच्या कार्याबद्दल, त्यांच्यावर सूडबुद्धीने लावलेल्या पोलीस केस बद्दल, रा.स्व.संघाचं सरकार त्यांची मुस्कटदाबी कशी करत आहे हे जास्तीत जास्त लोकांना आपण सांगितलं पाहिजे. जमेल त्या मार्गानं जास्तीतजास्त लोकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे.लोकशाहीचे सर्व संकेत वेशीवर टांगून “फॅसिस्ट रा.स्व.संघाच्या फडणवीसी सरकारचा जो नंगानाच खुलेआम सुरु आहे” त्याचा तिव्र निषेध करत आपण सर्वांनी आनंद तेलतुंबडे यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात “हाळी”दिली पाहिजे.
आजपर्यंत आनंद तेलतुंबडे ज्या दलित-श्रमिक समाजाचा आवाज बनले होते त्या सर्व समाजानी आता आनंद च्या सुटकेसाठी बोलावं लागेल. आवाज उठवावा लागेल.
आपआपल्या कुवतीनुसार …आपल्याला जमेल त्या मार्गानं सत्ताधारी “संघीच्या या कारस्थानांविरुद्ध”आपल्याला बोलावं लागेल… एकजूट करून आनंद तेलतुंबडेंना वाचवावं लागेल… फॅसिस्ट रासवटीचा “डाव उधळून टाकून धोक्यात आलेली लोकशाही वाचवावी लागेल.

आनंद तेलतुंबडे यांना आधार देण्यासाठी या लिंक वर क्लिक करा http://chng.it/8nzj6tjm… मात्र फक्त *क्लिक करून थांबू नका* तर आनंदवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करा. *प्रत्यक्ष लढाईत सामील व्हा!
-मिलिंद भवार
9833830029

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम युतीने संपूर्ण राजकरणाची आणि समाजकरणांची समीकरणे बदलली.

मंगळ फेब्रुवारी 5 , 2019
Tweet it Pin it Email डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतावादी व्यवस्थेला परिवर्तनाचा दिलेला हादरा इतका जबरदस्त होता की त्या हादऱ्यातुन ही व्यवस्था संविधानिक पातळीवर संपली आहे मात्र त्या व्यवस्थेचे मुळे जी इथल्या सामाजिक स्तरावर खोलवर रुजलेली आहे त्यांना उखडून फेकून देण्याची खरी गरज आहे . Pin it Email https://www.ambedkaree.com/who-is-anandteltumbade/#SU1HLTIwMTgxMjE जाती-जातीत फूट […]

YOU MAY LIKE ..