आपण बुद्धिस्ट का आहोत….?? —प्रश्न अस्वस्थ मानातला ..!

 

आपण बुद्धिस्ट का आहोत….?? —प्रश्न अस्वस्थ मानातला ..!

प्रबुद्धजन हो….
मी एक सर्वसामान्य भारतीय नागरिक आहे परंतु भारतीय नागरिक असतांना महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी आहे. मला अभिमान आहे, मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य महार जात व आताच्या बौद्ध धम्मात जन्म घेतला आणि मला याचा सुद्धा अभिमान आहे की पूर्वाश्रमीची महार जात, जी अत्यंत प्रामाणिक, निती नियमाने चालणारी, लढाऊ, कणखर, चिवटवृत्ती बाळगणारी, असं म्हणतात की राजपुतांचे गुण खऱ्या अर्थाने अंगी बाळगणारी होती!!!!!! अशा महार जातीने डॉ. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर मुक्कामी विश्ववंदनीय तथागताच्या बौद्ध धम्माची लाखों बांधवांना सोबत घेऊन धम्म दीक्षा घेतली आणि तथागत गौतम बुद्ध, बौद्ध भिक्षू, मौर्य कुळातील राजे, सम्राट अशोकानंतर जगातील सर्वात मोठे धम्मपरिवर्तन करून धम्मचक्र खऱ्या अर्थाने जगावरी फिरवले, असे म्हणता येईल….

मला बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की आपण बौद्ध धम्मीय म्हणून वाटचाल करीत आहोत काय? वेगवेगळ्या बौद्ध संघटना एकत्रित का येत नाहीत? आपली शक्ती का एकटवत नाही? डॉ.आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण नंतर काळ फारच पुढे गेला आहे, आज आपण काय पाहात आहोत…. आपण खरंच बौध्द धम्मानुसार आचरण करतो का? आपल्यात बाबासाहेबांना अपेक्षित धम्माच्या दृष्टीने परिवर्तन झाले का? भारतातील अन्य लोक, जग आपल्याकडे आज काय म्हणून पाहातात? आपले बौद्ध म्हणून identification भारतात का होत नाही? राजकीय पक्ष आपली नोंद buddhist म्हणून का घेऊ इश्चित नाहीत? हे प्रश्न तर आहेतच त्याचबरोबर आपले धार्मिक कार्यक्रम बौद्ध धम्मानुसार चालतात का? अजून असे किती लोक आहेत की बोलताना बौध्द म्हणून सांगतात आणि मनाने, मानसिकरित्या हिंदू, ब्राह्मणी, मुस्लिम, ख्रिस्ती, रामदासी धर्माप्रमाणे वागताना दिसतात, त्यांचे गुलाम आहेत? ते बाटगे आहेत का? असे प्रश्न विचार करणारा व्यक्ती इतरांच्या दृष्टिकोनातून अतिरेकी, अतिरंजित, वेगळा, अहितकारी का वाटावा?

आपली वैचारिक बैठक कुठेतरी एकमार्गी, पक्की नसावी, आपण तारुण्यापासून वृद्धापकाळापर्यंत ज्या-ज्या लोकांशी सामाजिक, राजकीय, व्यावसायिक क्षेत्रांत जोडले गेलो, वैवाहिक दृष्ट्या नातेसंबंध निर्माण झाले, संकटात एखादया बुवा, बाबा, पीर-फकीर, ख्रिस्ती पाद्र्याने चमत्कार दाखवून आपली मानसिकता बदलली, त्याचा पगडा, विचारांचा प्रभाव कायम राहतांना दिसून येत आहे….ही विचारणीय बाब नाही का? आपण बौद्ध म्हणून कागदोपत्री, नामधारी ठरत आहोत.. आपण हा विचार का करीत नाही की बौद्ध धम्म आपली आध्यत्मिक शक्ती, मनाची एकाग्रता बलवान बनवू शकतो? हीच शक्ती जर आपण एखादया बुवा, बाबा, मुस्लिम पीर, फकीर, ख्रिस्ती पाद्र्याकडून मिळवत असू तर ती बौद्ध तत्वज्ञान अंगिकारून, गाथेच्या नियमित पठणातुन, विपश्यना करून का नाही मिळणार….??? यादृष्टीने आपले भिक्षु, बौद्ध आचार्य कमी पडत आहेत काय? की तेही सर्वधर्मसमभाव नात्याने वर्तन करीत आहेत?
आज सर्व्हेच्या नावाने कुणीही घरी आला तर घरातील मोठी माणसेच नव्हे तर शाळकरी मुले सुद्धा आम्ही अनुसूचित जातीचे आहोत असे ठामपणे सांगतात…..निदान त्यांना घरातील माणसांनी सांगायला नको का की आम्ही बौद्ध आहोत, कुठेतरी याची नोंद व्हायला नको का? आपण असे वागून फार मोठे नुकसान बौद्ध धम्माचे होत नाही का?

वरील सर्व प्रश्न आपण स्वतःला विचारणे योग्य ठरेल असे मला वाटते…. आणि सुरुवातीला किमान स्वतः पुरते तरी बौद्ध आचार विचार पाळले पाहिजेत नाही का? मग कुटुंबात, समाजात कुणीही कितीही विरोध करोत, आपण जर बौद्ध धमाच्या तत्वानुसार नीट वागलो तरच पुढची पिढी आपले योगदान लक्षात ठेवून आपल्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करील……..!!!!

एक छोटासा संवाद साधण्याचा प्रयत्न पण परिपूर्ण असेल असा नाही, काही चुकाही असतील…. !!

आपला धम्मबंधु,

विलास भांबेडकर
9867940136

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *