बहुजनांना शिक्षणाचे दार खुले करणारा अन वंचितांना न्याय देणारा राजा….!

बहुजनांना शिक्षणाचे दार खुले करणारा अन वंचितांना न्याय देणारा राजा….!

शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाला.

‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.

राजर्षी चे कार्य आणि राजर्षी म्हणुन गौरव

त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना ‘राजर्षी’ ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.

जन्म आणि घराणे …!
शाहू महाराजांचा जन्म जून २६, इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे जयसिंगराव (आप्पासाहेब), आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च, इ.स. १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले. एप्रिल २, इ.स. १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे मे ६, इ.स. १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.

शाहू महाराजांचा २६ जून हा जन्म दिवस ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो.

महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. राजर्षी शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी फार तळमळ होती. कारण माणसाला पशुत्वापासून मनुष्यत्व मिळवून देणारे एक प्रभावी अस्त्र म्हणजे शिक्षण होय. त्यामुळे शिक्षणाशिवाय आपला उध्दार होणार नाही. हे राजर्षीनी ओळखले होते. म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. एवढेच नाही तर ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळांची निर्मित केली. आणि एवढ्यावरही महाराज थांबले नाहीत तर जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद केली. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.

अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्‍या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणार्‍या, तंत्रे व कौशल्ये शिकवणार्‍या शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले.शाहू राजे हे त्यांच्या कर्तृत्वामुळे नावाप्रमाणेच यशवंत राहिले. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा व कार्याचा वारसा मोठ्या समर्थपणे घेऊन जाण्याचे कार्य करणारा एक महान मानवतावादी राजा म्हणून राजर्षी शाहू महारजानी आपली ओळख निर्माण केली. या व्यापक दूरदृष्टीच्या राजाने त्याकाळी राजेशाही असतांनासुध्दा सामाजिक बंधूभाव, समता, दलित व उपेक्षित बांधवांचा उध्दार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रिडा व आरोग्य इत्यादी महत्वपूर्ण क्षेत्रामध्ये आजच्या लोकशाहीतील शासनालाही करणे शक्य होत नाही. असे अद्वितीय स्वरुपाचे कार्य केले.

मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून या निधड्या छातीच्या समाजसुधारकाने ६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली. नुसती घोषणा करुन थांबणारे ते राजे नव्हते तर त्वरीत अंमलबजावणी करुन संबंधीत अधिकाऱ्याकडून अहवाल मागविले. शाहूंच्या या निर्णयाला तेंव्हा सामाजिक कार्यकर्ते म्हणवणाऱ्या अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला. राजर्षीवर अनेक प्रकारचे आरोप केले.त्यांनी अस्पृश्यांना (त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या) राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकर्‍या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली.. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली.

त्यावेळेस धर्मव्यवस्थेने स्त्रियांना अतिशय उपेक्षित ठेवले. त्यांचे हक्क, अधिकार, नाकारले, स्त्री म्हणजे केवळ चूल व मूल या पुरतीच मर्यादित ठेवली त्याकाळी धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची अतिशय विचित्र पद्धत आपल्या देशात चालू होती. परंतु राजांनी आपल्या संस्थानात जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करुन ही पद्धत बंद पाडली. जातीभेदाचे प्रस्त नष्ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशर मान्यता दिली. तसा कायदा पारित केला आणि याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आपल्या चूलत बहीणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. एवढेच नव्हे तर संस्थानात जवळजवळ १०० मराठा धनगर विवाह घडवून आणले. अशा अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक व दर्जा मिळवून दिला.

तत्कालीन परिस्थितीमध्ये जातीव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला, त्यामुळे त्यांचे जीवन नैराश्यमय झाले. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी चोऱ्या, दरोड्यांचा मार्ग अवलंबला. त्यामुळे ब्रिटीश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गावकामगाराकडे हजेरी लावावी लागत असे. शाहू राजांना या लोकांविषयी कणव होती. कारण ते खऱ्या अर्थाने वंचितांचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी हजेरी पद्धत बंद केली. या जाती जमातींच्या लोकांना एकत्रित करुन गुन्हेगारीपासून त्यांना परावृत्त केले. त्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार, रथाचे सारथी निर्माण केले. त्यांना घरे बांधून दिली. वनवन भटकणाऱ्या लोकांना राहण्याची सोय झाली. पोटापाण्याची सोय झाली. त्यामुळे गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येऊ लागले.

गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल. मात्र त्यांना प्रेमाने, मायेने आपलेसे करुन समाजात सामाजिक दर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच.

वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले.

शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकर्‍यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, राधानगरी धरणाची उभारणी, शेतकर्‍यांना कर्जे उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी आपल्या संस्थानात राबविले, कमालीचे यशस्वी केले. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला, नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली. राजांनी त्याकाळी पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन राधानगरी नावाचा प्रकल्प उभा केला. जेणेकरून भविष्यात माझ्या रयतेला दुष्काळाला सामोरे जावे लागणार नाही ही दूरदृष्टी ठेवून राधानगरी धरणाची निर्मिती केली.

राजषी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले.

महाराजानी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली.

शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रृत आहेत. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले.

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

समता सैनिक दल गुजरात प्रमुख भानुभाई चौहान यांच्या कारवार अज्ञात वाहनांची धडक

बुध मे 9 , 2018
Tweet it Pin it Email समता सैनिक दल गुजरात प्रमुख भानुभाई चौहान यांच्या कारवार अज्ञात वाहनांची धडक समता सैनिक दल गुजरात प्रदेश मुख्य संचालक भानूभाई बेचारभाई चौहान यांच्या कार वर जबरदस्त धडक झाली त्यात ते जबरदस्त जखमी झाले आहेत . सध्या ते बरोडा येथील श्रीजी हॉस्पिटल येथे उपचार चालू आहेत […]

YOU MAY LIKE ..