दैनिक महानायकचे संपादक मा.बाबा गाडे यांनी वाहिली संपादक कुंदन गोटे यांना आदरांजली

कुंदनचे अकाली जाणे
आंबेडकरी चळवळीची हानी.
 

दैनिक महानायक आणि कुंदनचे अतूट नाते !!

ध्यानी मनी नसताना, अचानक कुंदन गोटे गेल्याची बातमी आली. कुंदन गोटे मितभाषी संपादक , पत्रकार . शून्यातून विश्व निर्माण करणारा ध्येय्यवादी मित्र. आमची मैत्री ३० वर्षाची.

नोटरी Ad. दिपक म्हस्के यांचे मेहुणे असल्याने त्यांची प्राथमिक ओळख झालेली. २० वर्षापूर्वी मुब्र्याला त्यांच्या घरी आम्ही त्यांच्या घरी गेलो तेंव्हा कोकण सकाळ नावाचे छोटेसे दैनिक कुंदन गोटे चालवायचे. ते ही नफ्यात. मला मोठे कौतुक वाटले. चंदन आणि कुंदन हे दोन्हीही भाऊ अत्यंत निष्ठेने हे वृत्तपत्र चालवायचे. माझ्या डोक्यात दैनिक महानायकची त्यावेळी फक्त कल्पना होती. या निमित्ताने भेटी-गाठी चालू होत्या . अनेक थोरा-मोठ्यांशी चर्चा झाडत होत्या . त्यासाठी सगळा महाराष्ट्र मी फिरत होतो. पण पत्रकार , संपादक कुंदनला हि संकल्पना खूपच आवडली . घरातून दहा हजार रुपये काढले आणि सकाळी हातावर ठेवले. म्हणाले ..
“बाबा , मी महानायकाचा पहिला लाईफ मेंबर !! लगेच कामाला लागा. या पैशातून आधी पत्रक छापा . काही आर्थिक मदत लागली तर निसंकोचपणे मला सांगा. ” केवढी हिम्मत कुंदनने दिली . त्याच उत्साहाने औरंगाबादला आलो आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. त्यानंतर कुंदनच्या भेटी होत गेल्या. महानायकची मूर्त संकल्पना प्रत्यक्ष आकाराला आली ती कुंदन गोटे यांच्यामुळेच. महानायाकच्या लोकार्पण सोहळ्यालाही कुंदन आवर्जून उपस्थित होता.
पुढे महानायकची आर्थिक स्थिती हलाखीची झाली. सोबतचे लोक महानायकला आलेल्या आर्थिक नुकसानीमुळे पळून गेले. मी सैरभैर झालो , काय करावे काही सुचेना. कुंदनला याची कल्पना होतीच. दिपकला निरोप दिला कि , बाबांना घेऊन मुंबईला या. निरोप आला तसा आम्ही गेलो. पुढील वाटचालीवर चर्चा झाली. मी प्रस्ताव ठेवला कुंदन , तुमचे व्यवस्थापन कौशल्य चांगले आहे. तुम्ही महानायक चालवा. त्यावर कुंदन म्हणाले , “मला विचार करायला वेळ द्या. तूर्त हे ५० हजार रुपये , तुम्हाला राहू द्या . निराश होऊ नका. मी माझा निर्णय कळवतो. “
आम्ही औरंगाबादला पोहोचलो. कुंदन महानायक यशस्वीपणे चालवणार याची मनोमन खात्री होती कारण व्यवसाय कसा चालवावा याचे पूर्ण व्यवहारी ज्ञान कुंदनला होते.

अपेक्षेप्रमाणे कुंदन महानायक चालवायला तयार झाला. बैठकित ठरल्याप्रमाणे मोठ्या हिमतीने स्वतः पैसा लावून कुंदनने महानायक सुरु केला. सहा महिने झाले पण त्याच्या आगमनाने पळून गेलेले लोक जागे झाले. त्यांच्या हस्तक्षेपाने ठरलेला करार काही होईना. कुंदनने या मंडळींना स्पष्ट सांगितले कि बाबांची प्रामाणिक इच्छा आणि त्यांची तळमळ म्हणून ना नफा ना तोटा या तत्वावर हे सामाजिक चळवळीचे वृत्तपत्र मी चालवीत आहे. बाकी यामागे माझा कोणताही स्वार्थ नाही, पण सहा महिने उलटूनही “एमओयु” होत नसल्याने कुंदन नाराज झाला. निरोप आला कि , “बाबा , तुमचे लोक महानायक चालू राहावा , या मताचे नाहीत. असो, मित्र म्हणून मी तुम्हाला हि मदत केली. सहा महिने मी महानायक चालवला. आता पुढे माझी इच्छा नाही. भविष्यातही काही लागले तर सांगा. या काळात माझा जो काही खर्च महानायकसाठी झाला तो मी माझे मित्रत्वाचे आणि सामाजिक कर्तव्य होते असे मी समजतो. वाईट वाटून घेऊ नका. ” असा हा दिलदार मित्र !!

लोकनायक आणि धम्मशासन दैनिकांचा निर्माता.
पुढे कुंदन गोटे यांनी ” लोकनायक ” आणि “धम्म शासन ” या दोन दैनिकांना महाराष्ट्राला अर्पण केले. ठाण्यात मोठे साम्राज्य उभे केले. महाराष्ट्रातील बहुसंख्य जिल्ह्यात कुंदन गोटे आणि चंदन गोटे या भावांनी हि दोन्हीही दैनिके पोहोचवली.

बाबा , रिपब्लिकन ऐक्यासाठी काही तरी करूयात..

अधून मधून कुंदन बोलायचा “बाबा आपण रिपब्लिकन ऐक्यासाठी काही तरी करूयात. मुंबईला एक बैठक बोलवा. तुम्ही , मी , बबन कांबळे आणि सुनील खोब्रागडे पण मिळून सर्व नेत्यांना बोलूयात. आपले त्यांना ऐकावेच लागेल. समाज एक आहेच. आपण नेत्यांचे ऐक्य करूयात. ” मी गमतीने म्हणायचो आपले चौघांचे तरी जमेल का ? तुम्ही घ्या पुढाकार . पण हे करायचे राहूनच गेले. !!

अखेर गावच्या मातीत विसावला कुंदन !!

जालना जिल्ह्यातील दाई अंतरवाली हे कुंदन गोटे यांचे गाव . मुब्र्यात सामाजिक आणि राजकीय साम्राज्य असतानाही , आपल्या गावावर आणि गावाच्या मातीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या कुंदनची गावाच्या मातीची ओढ काही कमी झाली नाही. अखेर याच गावाच्या मातीत कुंदन विसावला.
आपला प्रत्येक कौटुंबिक कार्यक्रम कुंदन गावी करायचा. भीम जयंतीचा कार्यक्रम हे तर त्यांचे खास वैशिष्ट्य !! अनेक मान्यवरांना त्यांनी या निमित्ताने आपल्या गावी नेले. कोणत्याही सामाजिक-धार्मिक कार्यात कुंदन मोठ्या आत्मीयतेने तन-मन-धनाने सहभागी व्हायचे. मराठवाड्यातला कुणीही माणूस मुंबईत गेला कि , कितीही व्यस्तता असली तरीही कुंदन यांनी पाहुणचार केला नाही असे घडणे केवळ अशक्य .

अशा या मित्राचे असे अकाली जाणे , मनाला अस्वस्थ करणारे आहे पण नियतीपुढे कुणाचे काहीही चालत नाही हेच खरे !!
अशा या अवलिया मित्राला औपचारिक श्रद्धांजली अर्पण करणे सोपे नक्कीच नाही.

अलविदा मित्रा…..

– बाबा गाडे -वरिष्ठ पत्रकार ,संपादक दैनिक महानायक,औरंगाबाद 

Author: Ambedkaree.com

1 thought on “दैनिक महानायकचे संपादक मा.बाबा गाडे यांनी वाहिली संपादक कुंदन गोटे यांना आदरांजली

 1. जय भीम
  साहेब..
  मी शिवाजी साहेबराव खरात …
  रा.पारडगाव ता. घांसावणी जालना
  कुंदन गोटे यांचा मेहुणा…
  साहेब आपण कुंदन गोटे साहेब यांच्या श्रद्धांजली अर्पण केली त्या बद्दल कुंदन गोटे परिवार आणि माझ्या कडून आभार व्यक्त करत आहोत. …

  कळावे आपला मित्र…
  शिवाजी साहेबराव खरात
  मोबाईल नं 9699136481

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *