शांत चैत्यभूमी अभियान…

शांत चैत्यभूमी अभियान…
मुंबई,ता.६.- राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी, दादर येथे जगभरातून लाखोंच्या संख्येने डॉ.बाबासाहेबांचे अनुयायी स्वयंशिस्तीने अभिवादनासाठी चैत्यभूमी येथे येत असतात.दरवर्षी ही संख्या वाढतेच आहे.याठिकाणी डॉ.बाबासाहेबांच्या विचारांच्या साहित्याची विक्रमी विक्री होत असते.परंतु चैत्यभूमी आणि सभोवतालच्या परिसरातील कॅसेट, सीडी विक्रेत्यां मधील विक्रीच्या स्पर्धेमुळे त्यांच्या स्पीकरचे आवाज अतिशय वाढतात.त्यामुळे येथील वातावरणातील गांभीर्य लोप पावते. ही बाब “सोशल एज्युकेशन मूव्हमेंट”ने हेरली,आणि सुरू झाले “शांत चैत्यभूमी अभियान”.पहिल्या वर्षी अगदी हातच्या बोटावर मोजण्याजोग्या महिला कार्यकर्त्यांच्या साहाय्याने सुरू झालेल्या या अभियानात यावर्षी ता.५व६डिसेम्बर या दोन्ही दिवशी सुमारे ३००(तीनशे)महिलांनी सहभागी होऊन चैत्यभूमी शांत ठेवण्यास मोलाचे योगदान दिले.
या महिलांची खरी कसोटी ता.६ डिसेम्बर या दिवशी होती.सकाळी १०वा.अभियानाला सुरुवात झाली.प्रथम शिवाजीपार्कच्या प्रवेशद्वारा जवळील कोपऱ्यात गीत गायनाचा कार्यक्रम सुरू होता.अभियानातील महिलांनी तिथे जावून आयोजकांना या दिवसाचे गांभीर्य आणि अभियाना बाबतची भूमिका समजावून सांगितली.आयोजक मान. मनोजजी संसारे(माजी नगरसेवक) यांनी अभियानाला चांगला प्रतिसाद दिला. आपला कार्यक्रम आटोपता घेऊन महिलांच्या या उपक्रमास उत्तम सहकार्य केले.तसेच दिवसभर बिलकुल आवाज देखील येऊ दिला नाही.त्याबद्दल सर्व आंबेडकरी अनुयायी त्यांना धन्यवाद देत होते.त्यांचे कौतुक करीत होते.परिसरातील सीडी विक्रेत्यांनी आधीच आवाज कमी करून अभियानाला सहकार्य केले होते.त्यामुळे जनता त्यांना ही धन्यवाद देत होती.परिणामी मागील वर्षापेक्षा यावर्षी अधिक शांतता असल्याचे अनुभवास आले.या उपक्रमाची दखल अनेक जाणकारांनी घेतली असून,शेकडो कार्यकर्त्यांनी या उपक्रमाच्या व्हिडीओ क्लिप्स काढल्या आहेत.
तथापि,शिवाजीपार्क मधील एक-दोन राजकीय पक्षांचे लोक मात्र चैत्यभूमीचे गांभीर्य भंग करीत होते.अभियानातील महिलांनी समजावून सांगून देखील ते ऐकत नव्हते. त्यांना आज ना उद्या याचे गांभीर्य समजेल,अशी आशा धरू या.
या ऐतिहासिक कार्यात मानखुर्द,गोवंडी, चेंबूर,गुरू तेगबहादूर नगर,वडाळा,दादर,लोअर परेल(डीलाई रोड),गोरेगाव,मीरा रोड,खंबाला हिल,कुलाबा अशा मुंबईच्या विविध विभागांतून तसेच कल्याण,नाशिक,जळगांव, नागपूर या जिल्ह्यातून व कोलकाता,प.बंगाल येथील महिलांनी सहभाग घेतला.या अभियानाच्या यशस्वीते करिता उज्जवला रोकडे,शर्मिला ओव्हाळ,संगीता हिरे,सुलेखा टिकादर,सुषमा राजगुरू,यामिनी शेंडे,आशा तिरपुडे,शिला भगत,माया चव्हाण,रजनी कांबळे,रसिका टेम्भुरने यांनी अथक परिश्रम घेतले.
आपल्या कुटुंबात आंतर जातीय विवाह घडवून आणणाऱ्या आयु.मीना उबाळे यांच्या हस्ते या अभियानाचे उदघाटन झाले.
याकामी महिलांच्या जेवण-नाश्ता आणि चहापानाची चोख व्यवस्था संतोष जाधव,सिद्धार्थ धांडोरे,प्रकाश गायकवाड,राजु पडवळ यांनी केली.तर अमित म्हेत्रे,सुनील बसवन्त,ए. आर.कांबळे,अरविंद मुन,आनन्द अलोने व सहकाऱ्यांनी अभियानात सामील झालेल्या महिलांना भोजन,चहा, पाणी आदी सुविधा जाग्यावर उपलब्ध करून देण्यासाठी अपार मेहनत घेतली.सदरचे “शांत चैत्यभूमी अभियान यशस्वी करण्याकरिता “सोशल एज्युकेशन मूव्हमेंट”च्या वरिष्ठ मार्गदर्शकांनी उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले.

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *