वंचित बहुजन आघाडी ला मतदान का करावे?

वंचित बहुजन आघाडी ला मतदान का करावे?

१) ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी सोशल इंजिनिअरिंग चा फॉर्म्युला आपल्या समोर मांडला. आज पर्यंत ज्या जाती समूह हे केवळ मतदानासाठी उमेदवारांना माहीत होते ते आता छोटे मागास जाती समूह स्वतःचे उमेदवार म्हणून उभे राहू शकले. हे छोटे छोटे मागासवर्गीय यांनी कधीही विकसित जीवन अनुभवलेले नव्हते. केवळ वेठबिगारी काम करून पोट भरणे आणि कोणत्याही परिस्थितीत जीवन जगणे हे त्यांनी नशिबाचा भाग म्हणून समजून घेतले होते. त्यामुळे बाळासाहेबांचा हा फॉर्म्युला मला महत्वाचा वाटतो. कालचे मुके बोलू लागले, जयभीम चा नारा देऊ लागले.
२) आजही अनेक जाती समूहांना त्यांच्या आरक्षणाचा अधिकार काय आहे हे ठाऊकच नाही. कारण आरक्षण देणारे लोक दुसरे होते. स्वतःच्या समूहाचे प्रतिनिधी जिथपर्यंत संसदेत किव्हा विधानसभेत नसतील तर जो आरक्षणाचा प्रश्न मांडायचा तो ताकदीने मांडला जात नाही. चर्चा करता येत नाही. एखादा व्यक्ती स्वतःच्या जातीच्या मागासलेपणाचे दाखले तेव्हाच देऊ शकतो जेव्हा तो त्या प्रक्रियेतून गेलेला असतो. काही पुरोगामी लोक अश्या मागासवर्गीय जातींसाठी कळवळा दाखवतात पण तो आवाज केवळ आवाज असतो. पोटातील भुकेचा आवाज केवळ त्या त्या जातीतील लोकांचाच येऊ शकतो. जर का आपण अश्या दुर्लक्षित घटकातून आलेल्या उमेदवारांना निवडून दिले तर ते देखील प्रगती करतील आणि समानता येऊ शकेल.
३)वंचित बहुजन हे या महाराष्ट्र राज्य मध्ये अनेक आहेत पण त्यांच्या नावासकट लोकांना त्यांची माहिती नाही. अनेकदा लोकांचा एकच समज होतो दलित म्हणजे बौद्ध बाकी कोणी नाही. पण मुळात बौद्ध हे दलित घटकात येत नाहीत. बौद्धांनी त्यांच्या उद्धाराकरिता 1956 लाच बाबासाहेबानी दिलेल्या बौद्ध धम्माची वाट धरली. स्वतःचा आर्थिक, शैक्षणिक, आणि सामाजिक विकास हा बाबासाहेबांच्या तत्वामुळेच ते करू शकले. पण आजही बौद्धांना दलित म्हणूनच पाहिले जाते. या मागासवर्गीय लोकांमध्ये अनेक जाती अश्या आहेत ज्यांना ते स्वतः दलित आहेत हेच माहीत नाही. मी दलितांची व्याख्या त्यांच्या आर्थिक स्थिती आणि सामाजिक परिस्थिती वर करतो. या लोकांना या दलित्व मधून बाहेर पडायचे असेल तर आज बाळासाहेबांनी उभ्या केलेल्या वंचित बहुजन आघाडीला साथ दयायला हवी.

४) आजही गाव खेड्यात जेव्हा मतदान होऊन जाते आणि मतदानाची टक्केवारी विजयी उमेदवाराला कळते तेव्हा तो ज्या भागातून जास्त मते पडली तिथे काम करायचे ठरवतो. अनेकदा तर एखाद्या गावात मागासवर्गीय लोकांचा विभागलेला जनसमूह असेल आणि त्यातील एखाद्या जातीचा समूह हा तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी कडे गेला तर त्या लोकांना सरळ मतदानाची आकडेवारी सांगितली जाते. या भागातून एवढे मतदान आम्हाला झाले त्यामुळे इथे आम्ही विकास करू, तिथे विकास करता येणार नाही. मग या वंचित घटकांनी कुठे जावे. स्वतःचा माणूस लोकप्रतिनिधी नाही. गावात एकमेकांपेक्षा जात महत्वाची असते आणि ही जात जात करत इथलं राजकारण खेळलं जाते. वंचित बहुजन आघाडीत कोणी मोठा नाही आणि कोणी लहान नाही सर्वच समान त्यामुळे प्रत्येक जाती समूहाने एकच विचार केला पाहिजे की आपला लोकप्रतिनिधी जर निवडून आणायचा असेल तर वंचित बहुजन आघाडीला मतदान करा.
५) वंचित बहुजन आघाडीतील लोकसभेचे उमेदवार ही ग्रामीण भागातील असल्याने त्यांना या मातीची जाण आहे. बे भरवशावर असलेली शेती, पाण्याची वानवा, उपासमार, सरकार दरबारी माराव्या लागणाऱ्या चकरा हे स्वतः अनुभवलेले लोक आहेत हे. जेव्हा अश्या मातीतील माणूस जेव्हा लोकसभेत जाईल तेव्हा त्याला त्या भागाबद्दल जास्तीचे प्रश्न विचारावे लागेल. पोटाला बसलेले चिमटे हे ओठांवर येतील तेव्हा या जगाला कळेल त्यांच्या समस्या. म्हणून वंचित बहुजन आघाडी च्या उमेदवारांना मतदान करायचे.
६)आज आपण पाहिले तर मुंबई च्या आसपासच्या परिसरात बघितले तर अनेक कोळी, आगरी, भंडारी समाज पूर्वीपासून म्हणजे मुंबईच्या प्रारंभीपासून इथे वसलेला आहे. त्यांना कसायला जमीन नाही तर ते समुद्रातील शेती करतात. पण मुंबईच नव्हे तर मुंबईसकट जो कोकण चा प्रदेश आहे तेथील मच्छीमार लोकांच्या समस्या या वाढलेल्या आहेत. पारंपरिक मच्छीमारी करणारे इथले कोळी बांधव हे इतर राज्यातून येणाऱ्या मासेमारीसाठी येणाऱ्या लोकांपासून त्रस्त आहेत. सोबतच त्यांच्या राहत्या जागेचा प्रश्न सुद्धा आता उपस्थित झाला आहे कारण कोस्टल रोड मुळे अनेक कोळीवाडे नष्ट होतील. मुंबईच्या जवळपास असलेल्या नवीन मुंबई, रायगड येथील गावठाण प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे. मुंबईपासून 50 किलोमीटरवर असलेल्या आदिवासी लोकांची परिस्थितीत बदल झालेला नाही. मग या त्यांच्या भागातील लोक प्रतिनिधी यांनी केले काय? अनेक जमिनी ह्या धनदांडग्या लोकांच्या नावावर आणि तिथे ऑरगॅनिक शेती केली जाते. ती शेती कसायला तिथलाच आदिवासी, आगरी समाज पण मलिदा खायला कोणी शेटजी किव्हा भटजी असतो. कष्टकऱ्यांच्या नावावर जर जमिनीचे तुकडे नसतील तर या पूर्वापार स्थानिक लोकांनी करायचे काय? जर ह्या लोकांचा आवाज लोकप्रतिनिधी च्या माध्यमातून पुन्हा एकदा जगासमोर आणायचा असेल तर वंचित बहुजन आघाडीला मतदान करायला हवे.
७) 2018 च्या पहिल्याच दिवशी जे भीमा कोरेगाव प्रकरण घडले. ज्यात ज्या लोकांनी धुमाकूळ माजवून आपल्या पुरोगामी महाराष्ट्र राज्य ची प्रतिमा धुळीस मिळवली. त्यानंतर काही पुरोगामी लोकांनी याविरुद्ध आवाज उठवला पण तो मोजकाच लोकांचा आवाज होता. इथले अनेक लोकप्रतिनिधी तर त्या प्रतिगामी, मनुवादी लोकांच्या मांडीला मांडी लावून बसले. अनेकांना वाटले की हा हल्ला, ही दंगल केवळ मराठा आणि बौद्ध यांच्यातील आहे पण तसे ते नव्हते. अनेक लोकांची माथी भडकावून लोकांची मानसिकता तयार करणे हा त्या मागचा मानस होता. आज एका समाजावर हल्ला झाला, उदया दुसऱ्या समाजावर होईल, परवा तिसऱ्या समाजावर होईल. कोणत्याही मागासवर्गीय समाजाने असे समजू नये की आमच्या समाजावर कोणी अन्याय करणार नाही. जर आपण असेच लोकप्रतिनिधी जे मनुवाद आणि सनातनी लोकांचा पुरस्कार करत आपली राजकीय पोळी भाजत असतील तर काय उपयोग या लोकांचा. हे सर्व रोखायचे असेल तर वंचीत बहुजन आघाडी मधील जे लोक बहुजन विचारधारा मानत आहेत त्यांना मतदान करायला हवे.
-प्रज्योत कदम
लेखक हे आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते आहेत .

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *