पद प्रतिष्ठा आणि संघटना…!

पद प्रतिष्ठा आणि संघटना
भारतात प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात संस्था,संघटना आणि राजकीय पक्ष यांचे मुबलक प्रमाणात निर्मिती होत आहे. त्यात आम्ही जात धर्म मानत नाही असे सांगणारे ही जाती पोट जातीच्या संघटना आणि त्यांचे राष्ट्रीय पातळीवर महासंघ निर्माण होत आहेत,त्यातील प्रत्येक नेता हा कोणत्यानां कोणत्या पक्षाचा व विचारधारेचा शिष्य भक्त असतो.त्याला त्यांच्या आर्थिक गरज भागविणाऱ्या सुविधा मिळत राहतात.त्यामुळेच तो खाऊन पिऊन तंदुरुस्त असतो.समाजाचे बिनधास्तपणे शोषण करीत राहतो. तो त्यांच्या विभागात व समाजात कट्टर विचारधारा मानणारा असतो.त्यांच्या विरोधात त्यांच्या समाजातील लोकांनी आवाज उचलला तर त्याला पोलिसांनी विविध मार्गाने त्रास दिलाच समजा.यामुळेच हा प्रत नसलेला माणूस संघटनेच्या पदाचा गैरवापर करून मोठा होतो.आणि विचारधारेचा खूनच करतो.
असंघटित कामगारांसाठी काम करीत असतांना आम्ही नाक्यावर पेंटर,कडीया मिस्त्री,बांधकाम करणारा बिगारी काम करणारे मजूर यांना संघटनेची पदे दिली. नाक्यावर कामगार,मजुरांना संघटनेमुळे पद व प्रतिष्ठा मिळते.नंतर तो आपल्या नगरात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या नजरेत भरतो, मग ते त्याला जवळ करतात.त्यामुळे आपोआप कार्यक्रमाला प्रेषक मिळतात व गर्दी दाखविण्यात यशस्वी होता येते.स्टेजवर त्याला चार शब्द बोलता आले नाही तरी चालतील फक्त स्टेजवरच्या नेत्याने गर्दी जमा केलेल्या या कार्यकर्त्यांचा नांव घेऊन सत्कार केला पाहिजे.एवढीच त्यांची अपेक्षा असते. ती पुरी न झाल्यास तो दुसऱ्याच दिवशी स्वतःची संघटना काढणार किंवा इतर संघटनेत जाऊन ज्या संघटनेमुळे मोठा झाला त्यांची बदनामी करणार.म्हणूनच कोणत्याही संघटनेचा कार्यकर्ता कसा असावा व कसा नसावा ? स्वतःला कार्यकर्ता समजत असाल तर स्वयंपूर्ण अभ्यासु वृत्ती असावी.स्वतःची वैचारिक ध्येय उद्धिष्ट स्पष्ट असावे.तर इतर संघटनेची पक्षाची अंतीम ध्येय, उद्धीष्ट्य समजून घेता येतील.हिंदुराष्ट्र निर्माण करण्याचे स्वप्ने दाखविणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित सर्व संघटना,संस्था,पक्ष,ट्रेंड युनियन यांचे अंतीम ध्येय,उद्धीष्ट्य स्पष्ट आहे म्हणूनच ते कुठेही जाऊन कोणत्याही संघटनेत काम करीत असले तरी आपले उद्धीष्ट्य विसरत नाही.बहुसंख्येने आदिवाशी विभागात काम करणाऱ्या संघटना ह्या कम्युनिस्ट विचारधारा मानणाऱ्या लालबावट्या वाल्या आहेत.संघटीत व असंघटित कामगारा मध्ये काम करणारे पुरोगामी समाजवादी संघटना,संस्था,पक्ष आपल्या मुख्य ध्येय धोरणा पर्यत पोचत का नाही?.त्यांचे काम कष्टकरी कामगार मजुरांच्या घराघरात असतांना राजकारणात भाजप सेना मनसे कशी काय यशस्वी होते.म्हणजेच संघटनेची तत्वप्रणाली त्यांना मान्य नसावी. त्यांना संघटनेचे अंतीम ध्येय, उद्धीष्ट्य त्याला माहित नसावे.माहिती असेल तर त्या आदिवासी समाजात कुशल संघटक,वक्ता आणि नेतृत्व का निर्माण होत नाही.केवळ आदिवासीच नव्हे तर ओबीसी, अल्पसंख्याक मागासवर्गीय समाजातही परप्रकाशित वक्तृत्व, नेतृत्व खुप आहेत.पण ते अंतीम ध्येय,उद्धीस्टा पर्यत पोचत नाही.कारण त्यांचा आर्थिक स्रोत आणि प्रेरणास्रोत वेगळे आहेत.त्यामुळेच त्यांना समाजाबद्दल किती आपुलकी आहे आणि किती नाही हे ठरविता येत नाही.संघटनेच्या कार्यकर्त्या बद्दल त्याच्या विचारात समता, स्वातंत्र्य,बंधुत्व किती असावे आणि मनात सद्भावना, प्रेम,आदरभाव किती असावा हे निश्चित होत नाही.
मग एकच आदर्श,प्रेरणा,श्रध्दा आणि प्रतिके असतांना वेगवेगळे व्यक्तिगत विचारांच्या संघटना पक्ष का निर्माण होतात?.बुद्ध धम्म आणि संघ यांची आचार संहिता एकच असावी,जर भारतीय राज्यघटना मान्य असेल तर संविधानातील सर्व कलमे सर्वांनाच मान्य असली पाहिजेत. पण असे दिसत नसल्यामुळे अंतीम ध्येय,उद्धीष्ट्य गाठता येत नाही असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
इतिहास वाचला तर इतिहास घडविता व लिहता येतो असे म्हणतात.मग स्वत:च्या समाजाचा पूर्वेतिहास त्याला माहित असावा की नाही?.कारण जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही असे म्हटले जाते.म्हणूनच या देशातील डाव्या विचारांचे कम्युनिस्ट,पुरोगामी, समाजवादी प्रथम हिंदुत्ववादी असतात. ते नेहमीच जाहीर स्टेजवर आम्ही जात,धर्म, पंथ,प्रांत मानत नाही असे जाहीर पणे बोलतात व लिहतात. पण योग्य वेळी योग्य ठिकाणी दर्शन घेतल्या शिवाय राहत नाही.यांच्या या आचरणा विरोधात बोलणारा, लिहणारा कार्यकर्ता विद्रोही,जातीवादी ठरतो.
आता तर तालुका,जिल्हा पातळीवर विद्रोही गट निर्माण झाले आहेत.कार्यकर्ता कसा घडवावा हाच प्रश्न विचारवंतांना पडतो.त्यामुळेच निष्ठावंत कार्यकर्ते निर्माण होण्या ऐवजी योग्य वेळी निष्टणारे कार्यकर्ते हलक्या कानाचे व संघटनेच्या नेत्यावर आणि उधिष्ठावर ठाम विश्वास नसणारे कार्यकर्ते निर्माण झाली आहेत.संघटनेच्या नेत्यावर आणि उध्दीष्ठ यावर ठाम विश्वास असणारे कार्यकर्ते संघटना, संस्था आणि पक्ष सर्व दृष्टीने मजबुत करतात, कोणती ही लाट,सुनामी येवो ते नेत्यांच्या,संघटनेच्या मागे ठाम उभे असतात.ते एकमेकांचा मानसन्मान ठेवतात व आदर करतात.पदलोभी कार्यकर्त्याच्या ठायी नेहमी अहंभाव असतो.तो पद व प्रतिष्टे साठी हापापलेला असतो.असे कार्यकर्ते शत्रुंपेक्षाही घातक असतात. ते स्वतःही संघटन वाढवीत नाहीत आणि इतरांनाही वाढवू देत नाहीत. संघटन फक्त लेटरपॅडवर शिल्लक राहते.
कार्यकर्त्याकडे आत्मचिंतन, आत्मपरीक्षण आणि निरीक्षण करण्याची वैचारिक शक्ति असावी.देशात, राज्यात आणि सर्वच समाजात घडणा-या लहानमोठ्या घटनांची त्याने नोंद ठेवली पाहिजे. आणि त्या घटनेवर आपल्या संघटनेची भूमिका काय असेल त्यावर त्याला बोलता,लिहता आले पाहिजे.त्यासाठी तोंडात साखर डोक्यावर बर्फ पायाला भिंगरी असली पाहिजे.काही लोक फक्त भाषण देण्यात खूप पटाईत असतात,पण संघटनात्मक कामात कार्यकर्त्यास जोडण्यास कमी पडतात.
काम करतांना स्वतः मध्ये आत्मविश्वास असला पाहिजे.
परिश्रम, चिकाटी आणि सातत्य ध्येय गाठण्यासाठी इतरांपेक्षा जास्त परिश्रम करण्याची तयारी हवी.असाच कार्यकर्ता नेता बनू शकतो.कार्यकर्ते जोडणारा असावा. तोडणारा नको. प्रभावी संघटन हिच संघटनेची शक्ति असते.चांगले काम करणारा कार्यकर्ता पुढे जात असेल तर त्यावर खोटे आरोप करुन त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न कदापी करु नये.कार्यकर्ता शिस्त व वेळ पाळणारा पाहिजे.
त्याला उपलब्ध साधनांचा काटकसरीने व कौशल्याने वापर करता आला पाहिजे.श्रेय लाटण्याची मनोवृत्तीचा नसावी.
कार्यक्रमाचे आयोजन करता यावे. संघटनेचे विविध उपक्रम राबविण्याची जबाबदारी स्वीकारावी. पुढाकार घ्यावा. किमान संघटनेच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये त्याचा सक्रीय सहभाग असावा. कार्यकर्त्याला संघटनेचा व स्वतःचा विचार दुस-यांस पटवून देता आला पाहिजे.संघटनेसाठी वेळ, बुद्धी, श्रम, कौशल्य,पैसा खर्च करणारा असला पाहिजे.संघटना समाजातील सर्वांच्या भल्यासाठी आहे. स्वत:च्या भल्यासाठी नाही. ह्याचे भान कायमस्वरूपी ठेवणारा असावा.त्यामुळे संघटनेसाठी सातत्याने काम केल्यास त्यांची प्रगती आणि संघटनेची गती कोणीच रोखु शकत नाही.ज्या संघटनेकडे वरील गुणधर्म असलेले कार्यकर्ते असतात.त्या संघटनेला जगात तोड नसते.त्यामुळेच पद प्रतिष्ठा आणि संघटना कायमस्वरूपी टिकून ठेवता येते.
म्हणूनच पदाची लाचारी सोडा.काम करून दाखवा.मग पहा गल्लीतलेच नव्हे तर दिल्लीतले पद तुमच्याकडे चालून येईल.संघटनेचे पद म्हणजे वाघा वर स्वर होण्या सारखे आहे.पद असे पर्यत समाजात व सरकारी प्रशासकीय कामात तुम्हाला प्रतिष्ठा मिळेल.आणि संघटनेचे पद गेल्यास समाज व प्रशासकीय अधिकारी कोणीच तुम्हाला मानसन्मान, प्रतिष्ठा देणार नाही,ज्यांनी डोक्यावर घेतले तेच पाया खाली घेण्यास मागे पुढे पाहत नाहीत.म्हणजे वाघा वर बसलेला व्यक्तीला प्रथम वाघच खाऊन टाकील. म्हणूनच पद प्रतिष्ठा आणि संघटना यांचे महत्व प्रत्येक कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवून काम करावे,
-सागर रामभाऊ तायडे, भांडुप मुंबई 9920403859,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *