दलित चळवळीची बदनामी का ?

दलित चळवळीची बदनामी का ?

नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी दलित चळवळ आणि साहित्यामुळे जातीभेद कायम राहिल्याचे अजब वक्तव्ये करुन चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे तो निंदनीय आहे. साहित्य संमेलना प्रमाणे, नाट्य संमेलन वादग्रस्त ठरवून प्रसिद्धी मिळविण्यासाठी गज्वींनी असे चळवळीवर आरोप तर केले नाहीत ना अशी शंका येते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विदर्भ साहित्य संघाला भेट दिली त्यावेळी त्यांनी, ‘मला साहित्यिकांना आवर्जुन सांगायचे आहे की, उदात्त जीवनमुल्ये, सांस्कृतिक मुल्ये, आपल्या साहित्य प्रकारातून आविष्कृत करा. आपले लक्ष संकुचित, मर्यादित ठेवू नका. त्याचे तेज खेड्यातील गडद अंधःकार दूर करण्यास प्रज्वलित करा. आपल्या देशात उपेक्षितांचे, वंचितांचे फार मोठे जग आहे हे विसरु नका. त्यांचे दुःख, त्यांची व्यथा नीट समजून घ्या आणि आपल्या साहित्यातून त्यांचे जीवन उन्नत करण्यास झटा त्यातचं खरी मानवता आहे’ असे म्हटले होते. बाबासाहेबांपासून प्रेरणा, स्फुर्ती घेऊन अनेक कवी, लेखक, पत्रकार निर्माण झाले.

फुले, शाहू, बाबासाहेबांच्या पुरोगामी महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे मागासवर्गीय, सामाजिक, राजकीय प्रतिष्ठा नसलेल्या वर्गाला आणि दिशाहीन वंचित समाजाला किती प्रतिकुलतेचा सामना करावा लागतो हे सर्वज्ञात आहे. त्यांच्यावर राजरोसपणे वेगवेगळ्या पातळ्यांवर, वेगवेगळ्या प्रकारे भयानक अक्षम्य, मानवतेला काळीमा फासणारे अन्याय – अत्याचार निर्दयपणे होत आहेत. माणगांव पाणी प्रश्न दंगल, खैरलांजी भोतमांगे वंश संहार, कानपूर पुतळा शिरच्छेद, सोनई, माता रमाई नगर पुतळा विटंबन, नितीन आगे, रोहित वेमुल्ला, स्वप्निल सोनावणे, ऊना, जवखेडा, मोबाईल रिंगटोन, जयंती मिरवणूकांवर दगडफेक, भीमा कोरेगांव हिंसाचार अशा अनेक अन्याय अत्याचार प्रकरणांनी क्रौर्याचे कळस गाठले आहेत. एवढेच नाही तर, महापुरुषांनाही सोडले जात नाही याला जबाबदार कोण प्रेमानंद गज्वी साहेब ?

मराठी साहित्यांने ह्रदयाला धक्के देणारे असे अनुभव अनुभवले नाहीत ते अनुभव दलित साहित्यांने दिले, प्रस्थापित मराठी साहित्य विश्वासमोर जबरदस्त आव्हान दिले, धक्के दिले आणि जागतिक पातळीवर आपले स्थान निर्माण केले. मराठी साहित्याला दलित साहित्यांनेच समृद्ध केले. नव्या प्रतिमा, नव्या शब्दकळा, नवा आशय, नवी उमेद दलित साहित्यांने मराठी वाःडमयाला दिले. दलित साहित्य म्हणजे एक ठोस विचार, ती एक चळवळ, तत्त्वज्ञान, समाज परिवर्तन, प्रबोधनाचे साधन असतांना, आंबेडकरी चळवळीशी, मातीशी निगडीत, इनाम राखणारे, माणसाला केंद्रबिंदू मानत असतांना दलित साहित्यांमुळे जातीभेद कसा कायम राहिल प्रेमानंद गज्वी साहेब ?

आंबेडकरी ( दलित ) चळवळ गटा तटात विखुरली गेली असली तरी, अन्याय – अत्याचार प्रश्नी सर्व मतभेद, मनभेद विसरुन सर्व एकत्र आले आहेत. महाराष्ट्रासह देशभरात ज्या ज्या वेळी अनुचित घटना तसेच इतर मागण्यांसाठी आंदोलने, चळवळी झाल्या आहेत. मग तो भूमीहीनांचा विराट देशव्यापी सत्याग्रह, दलित साहित्यिक चळवळ, दलित पँथर चळवळ, नामांतर लढा, रिडल्स प्रकरण, वरळी दंगल, कानपूर पुतळा शिरच्छेद, घाटकोपर माता रमाई नगर पुतळा विटंबन, भीमा कोरेगांव हिंसाचार अशा अनेक प्रकरणी आंबेडकरी जनतेने सर्व शक्तीनिशी रस्त्यावर येऊन आंदोलन केले, निषेध नोंदवला आणि त्यामुळे जातीभेद कायम राहिला का प्रेमानंद गज्वी साहेब ?

जातीय विषमता नष्ट करण्यासाठी प्राथमिक शाळांमध्ये बालवयातचं मुलांवर स्त्री पुरुष समानता, सर्व धर्म समभाव, संविधान, महापुरुषांची कार्य, वैज्ञानिक, व्यक्तिमत्व विकास, स्पर्धा परिक्षा, स्वातंत्र्य, समता, बंधुता तसेच असे सर्वसमावेशक उपयुक्त शिक्षणाचा अभ्यासक्रमात समावेश करण्या ऐवजी बालवयातचं पाठ्यपुस्तकांव्दारे मुलांवर विशिष्ट धर्माचे संस्कार लादले जाणार असतील आणि समाजात मनुवादी विचारसरणी फोफावत असेल तर जातीयता निर्मुंलन होईल का ? प्रत्येक जात आपण दुसऱ्या जातीपेक्षा कसे क्षेष्ठ आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असल्याने, कुरघोडी वाढत असून, त्यातूनचं देशात जातीवाद जीवंत आहे. सनदशीर मार्गाने प्रगतीपथावर असणाऱ्या तरुणांना भावनिक बनवून, त्यांची माथी भडकवली जात आहेत.अन्याय – अत्याचार प्रकरणी तर कोणत्याही राजकीय पक्षांच्या कधी प्रतिक्रिया, भूमिका स्पष्ट होत नाहीत. जाती निर्मुंलनासाठी व्यसनमुक्ती गांव, हगणदारीमुक्त गांव अभियानाबरोबरचं, जात मुक्त गांव अभियान राबविण्याची नितांत गरज आहे आणि त्यासाठी राजकीय पक्षांकडे सकारात्मक दृष्टीने आणि इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. कारण, जातीयता हीच मानसिकता बनली आहे. भारतीय राज्य घटनेच्या कलम १७ अन्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आली असतांना, तिचे कोणतेही आचरण निषिद्ध करण्यात आले असतांना, कायद्यानुसार अपराध असतांना, आजही देशात जातीयतेचे विषाणू जोपासले जात आहेत, त्याचे उघडपणे समर्थन केले जात असतांना जातीभेद कायम राहण्यास दलित चळवळ आणि साहित्य कसे जबाबदार असेल प्रेमानंद गज्वी साहेब ?

📝 मिलिंद कांबळे चिंचवलकर
(लेखक आंबेडकरी चळवळीतील अभ्यासक आहेत)

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *