“जो दिल के अच्छे होते हैं, दिमागवाले उनका जमकर फायदा उठाते हैं”

काही कोटेशन खूपच बोलके असतात. ते त्रिकालाबाधित संदेश देतात. “जो दिल के अच्छे होते हैं, दिमागवाले उनका जमकर फायदा उठाते हैं” हे त्यापैकीच एक कोटेशन. सध्या हे कोटेशन बौद्ध आणि सच्चा आंबेडकरवाद्यांना तंतोतंत लागू होत असल्याचे जाणवते. ‘जय भीम’ हा क्रांतिकारी मंत्र बौद्धांची जशी ताकद होय; तशीच ती त्यांची भावनिक कमजोरी असल्याचे काही धूर्त कोल्ह्यांनी ताडलं आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर एकमेव चलनी नाणं होय हे त्यांनी ओळखलं आहे. बौद्धेत्तरांनी साधं जय भीम बोललं तरी बौद्धांची छाती फुगते. त्यांनी बाबासाहेब सांगायला सुरुवात केली मग तर विचारायलाच नको ! नेमक्या याच कमजोरीचा काही वक्ते आज फायदा उठवताना दिसत आहे. अशांची संख्या नगण्य असली तरी त्यांचा भोळाभाबडा भक्तगण संख्येने मोठा आहे. गेल्या दशकात अवतरलेल्या एका वक्त्याने तर बाबासाहेबांच्या नावाचे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट गळ्यात लटकाऊन स्वैर फटकेबाजी सुरू केली आहे. यातून त्यांना मान, सन्मान, संरक्षण सारं काही मिळत आहे. समाजात उन्माद निर्माण करून Lime light मध्ये कसं राहायचं हे गणित त्यांना उमजलं आहे. पण त्यांच्या अशा स्वच्छंद फटकेबाजीने आंबेडकरवाद्यांच्या समाजजोडणीचं गणित बिघडत आहे याचे काय ? व्याख्यान, प्रबोधन म्हणजे वादविवाद स्पर्धा नसते हो ! 70 च्या दशकातील पॅन्थर पर्वातून बाहेर या. ती तेव्हाची अनिवार्य गरज होती; ती आता राहिली नाही. बाबासाहेबांच्या नावावर सुरू असलेली द्वेष, अहंकार, मत्सराची पेरणी बंद करा. बौद्ध धम्म सांगू नका; आचरणात आणा !
कोटेशनमध्ये मध्ये म्हटल्याप्रमाणे मन साफ असलेल्या भीमअनुयायांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेऊ नका !!
हे दीर्घ काळ नाय चालणार.
कारण शेवटी ते तथागत बुद्धाचे पाईक आणि क्रांतिसूर्य बाबासाहेबांचे बछडे होत…!
ते स्वयंप्रकाशित होतील.
संघर्षशील तर आहेतच !!

आज पुन्हा एकदा म्हणण्याची वेळ आलीय्-
अंधार फार झाला
पणती जपून ठेवा…!

#भीमप्रकाश_गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *